व्हॅलेंटाईन डे
दिनांक 14 फेब्रुवारी.
वेळ- सकाळी 11
फोन वाजतो. ती फोन उचलते.
ती- हॅलो
तो- हाय
ती- बोल
तो- आज संध्याकाळी क्लायंट कॉल आहे. घरी यायला उशीर होईल.
ती- किती उशीर?
तो- दहा तरी वाजतील.
ती- ठीक आहे. ठेऊ?
तो- एक मिनिट. अजून काहीतरी होतं. काय बरं?
ती- (मनातून खुश होत) काय?
तो- हम्म. येस. माझ्या धुवायला टाकलेल्या पँटच्या खिशात कॅश राहिली आहे. ती काढून ठेव मशीन लावायच्या आधी.
ती- बरं. ठेऊ?
तो- ओके. बाय.
ती फोन ठेवते.
ती- (स्वतःशी) आज व्हॅलेंटाईन दिवस आणि तो सकाळी साधं विश देखील न करता गेला. आत्ता फोनवर पण लक्षात नाही त्याच्या. वरून रात्री पण उशीरा येणार. नेमकी मुलंही शाळेच्या ट्रीपला गेली आहेत. ह्या दिवशी देखील मी एकटीच!
ती रागाने मशीन लावायला घेते. बाथरूम मध्ये लटकत असलेली त्याची पॅन्ट हातात घेते. पैसे काढायला खिशात हात घालते तर एक कागद मिळतो. ती कागदाची घडी उघडते. त्यावर लिहिलेले असते “प्रेम दिवसाच्या प्रेम भरल्या शुभेच्छा! किचन मधल्या वरच्या कपाटात बघ”
ती धावत किचन मध्ये जाते. कपाट उघडते. आत एक सुंदर ग्रीटिंग असते. त्यात शुभेच्छांच्या शेवटी लिहिलेले असते “तू माझा वॉर्डरोब उघडलास का आज? नाही? मग जा पटकन आणि उघड!”
ती धावत जाऊन त्याचे कपाट उघडते. त्यात एक टेडी बेअर हातात डोक्यावर I love असा बोर्ड लटकवून हातात आरसा धरून बसलेला असतो. ती तिचे प्रतिबिंब आरशात पहाताना ते शब्द वाचते. आणि लाजते. टेडीला उचलून मिठी मारते. त्याच्या गळ्यात एक चिठ्ठी सापडते. त्यावर लिहिलेले असते “बाथरूम मधले कपाट वाट बघत आहे!”
ती पळत बाथरूममध्ये जाऊन कपाट उघडते. त्यात एक बंद पाकीट असते. ती पाकीट उघडते. त्यात तिने गेल्या आठवड्यात पाहिलेली आणि तिला आवडलेली तीन हिऱ्याची नाजूक अंगठी असते. अंगठीबरोबरच्या चिठ्ठीत “तुझ्या कपाटातील शेवटचा खण बघ लवकर” असे लिहिलेले असते.
ती धावत जाऊन कपाट उघडून बघते. त्यात काळ्या रंगाचा सॅटिनचा सेक्सी शॉर्ट ड्रेस आणि तिचे आवडते परफ्युम असते. तिला त्यांचा गेल्याच आठवड्यात मॉल मध्ये एका दुकानाबाहेर झालेला संवाद आठवतो-
तो- (एका दुकानातील पुतळ्यावर घातलेला सेक्सी शॉर्ट ड्रेस बघून) कसा वाटतो हा ड्रेस?
ती- मस्त आहे.
तो- मग घेऊया?
ती- वेडा आहेस का? मी हा घालून घराबाहेर नाही जाणार.
तो- मी तुला जाऊन पण नाही देणार. फक्त मला आवडेल म्हणून घरात घाल.
ती- पुरे झाला वेडेपणा. घरात दोन मुलं आहेत कळत्या वयाची. काहीही बोलतोस. चल ट्रॉली घे. ग्रोसरी खरेदी बाकी आहे अजून.
तिच्या डोळ्यात पाणी तरळते. ती तो ड्रेस घट्ट कवटाळते. त्यातून एक चिठ्ठी पडते. त्यात लिहिलेले असते “तो ड्रेस घाल, ते परफ्युम मार आणि मगच शू रॅक उघड!” ती तो ड्रेस घालते. ते परफ्युम मारते. सहज आरशात बघते. आपण किती मस्त दिसतोय हे जाणवून सुखावते आणि स्वतःला त्या सेक्सी ड्रेसमध्ये बघून लाजते. इतक्यात तिला चिठ्ठी आठवते. ती शू रॅक उघडते. त्यात एक शॅम्पेन बॉटल असते आणि बरोबर एक चिठ्ठी असते. ती बॉटल हातात धरून चिठ्ठी वाचते. “तू माझा आवडता सेक्सी ड्रेस घालून, हातात आपल्या दोघांची आवडती शॅम्पेन घेऊन माझे स्वागत करत आहेस असे एक स्वप्न मला काही दिवसांपूर्वी पडले. I love you loads! माझं स्वप्न पुरं करणार का राणी सरकार? हे वाचून स्वतःशी हसू नको. तुझ्या टप्पोऱ्या डोळ्यात आश्चर्य आणि लाजेचे किलर कॉम्बिनेशन आणू नको. मला भीती वाटते. विश्वास नसेल तर दार उघड. मी आज त्या डोळ्यांनी मरायला तयार उभा आहे!”
तिला वेड लागायचे बाकी असते. ती अविश्वासाने दरवाजा उघडते. बाहेर तो लाल गुलाबांचा बुके घेऊन उभा असतो. ती त्याला मिठी मारते. आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी येते. तो त्याच्या हाताने तिचे डोळे पुसतो. बुके तिला देऊन “Happy Valentine’s day” असे विश करतो. तिला दोन्ही हातांनी अलगद उचलून घेतो. घरात शिरुन पायाने मागच्यामागे दरवाजा बंद करतो. व्हॅलेंटाईन डे सुरु झालेला असतो!- मंदार जोग
मित्रमैत्रिणींनो व्हॅलेंटाईन डे च्या प्रेमळ शुभेच्छा!!!
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023