चौक….
मी एकाची वाट पहात कटिंग पीत एका चौकात फुटपाथवर थांबलो आहे. इतक्यात साधारण तीशीची गोरीपान सुंदर मुलगी टॅक्सीसाठी त्या चौकात येऊन उभी रहाते. मुलीने स्लीव्हलेस टॉप आणि स्किन कलरची घट्ट स्लैक असा पोशाख केला आहे. डोळ्यावर मोठ्ठा गॉगल. खांद्यावर पर्स आणि हातात एक पिशवी. पर्स मधील मोबाईला लावलेल्या इयरफोन मधून गाणी ऐकत ती उभी आहे. प्रथम लक्ष जाणाऱ्याला तिने फक्त टॉप घातला असावा असे वाटावे इतका तिच्या स्किनटाईट स्लैकचा रंग त्वचेच्या रंगाशी जुळणारा!
हळूहळू उन वाढत आहे. टैक्सी येत नाहिये. मुंबईच्या उन्हात उभी असलेली ती सुस्वरूप मुलगी मेणबत्तीसारखी वितळू लागते. पर्समधून रूमाल काढून घामच्या धारा पुसत रहाते. टैक्सी अजुन येत नाही. हळूहळू दूरून न्याहाळनारे भीड़ चेपुन जवळ जाऊ लागतात. माझ्या मागच्या चहाच्या दुकानाच्या गल्ल्यावर बसलेला मणिकचंदने दात लाल झालेला अस्थिपंजर राजस्थानी आणि त्याच्या दुकानातील कळकट बिहारी चायवाला पोर ह्यांच्यात तिने फक्त टॉप घातलाय की नाही ह्यावर कुजबुजात्या आवाजात हमारी तुमारी होते. चायवाला पोर्या खातरजमा करायला उगाच पुढे जाऊन तिला लाळघोट्या नजरेने न्याहाळत एक प्रदक्षिणा घालतो. परत येऊन “शी यार पहनी है वो टाईट पैंट” अशी वर्दी देतो. दोघे पांचटपणे बत्तीशी काढतात आणि कामधंदा सोडून तिला टक लाऊन ऑगल करत दात कोरत बसतात.
एक बेस्टची बस जाते. एरवी मुजोरपणे बस दामटणारा गॉगलधारी मराठी ड्रायव्हर समोरच्या राहदारीकडे दुर्लक्ष करत, बसचा स्पीड कमी करत तिला पहात असतो. बस पुढे गेल्यावरही लक्ष रेअर व्ह्यू मिरर मध्ये. घामाने निथळत हातगाडी ओढणारे पिळदार शरीराचे दोन श्रमिक तिला न्याहाळून वाळवंटात ओएसिस दिसण्याचा आनंद घेतात. बाइकवरून जाणारे गुलछबू तरुण गाडीचा वेग मंदावून तिला बिनधास्त आपादमस्तक न्याहाळून पुढे जातात. मागे बायको किंवा आई बसलेले दुचाकिसवार चोरटा कटाक्ष टाकत शक्य तेवढी तिला नजरेत साठवतात. रस्त्यावर चालणारे काही तर शेजारी किंवा समोर क्षणभर थांबून सगळ्या प्रश्नांची शहानिशा करून घेऊन पुढे जातात. आतापर्यंत दोघे चहावाल्याच्या गल्ल्याजवळ पहिल्या रांगेची तिकिटे एका कटिंगच्या बदल्यात मिळवून त्या राजस्थानी आणि बिहार्याच्या चर्चेत सहभागी झालेले असतात!
बाकी सायकल वरून फिरणारे वाण्याचे डिलिव्हरि बॉईज, फेरीवाले, एंगेज टॅक्सीतून प्रवासी नेणारे कळकट टॅक्सीवाले, भिकारी, कचरा उचलणारे, सकाळी रात्रीची न उतरलेले दारुडे, उठवळ गर्दुल्ले, रिकामटेकडे अनेक, काही निवृत्त आजोबा, काही पन्नाशीतले हिरवे, धोतर नेसून पुजेला जाणारे भिक्षुक सर्वांचा वेग नेमका त्या चौकात कमी होतो. काही रेंगाळतात, काही समोरून, काही बाजूने, काही मागून न्याहाळतात! त्या चौकात जणू सिनेमा मध्ये असते तसे सर्व व्यवहार स्लो मोशन मध्ये होत असतात! एकाचवेळी अनेक नजरा त्या मुलीवर खिळलेल्या असतात तिच्या अंगावरून फिरत असतात! टैक्सी काही येत नाही!
ती मुलगी कंटाळून बहुधा पुढील चौकात टैक्सी मिळेल ह्या आशेने एकदा घड्याळात पाहून घाम पुसत चालत निघते. काही गुलछबू तिच्या मागे नजर न हटवता निघतात. मग चौकाची मरगळ अचानक संपते. जीवनाला परत वेग प्राप्त होतो. लोकांना नजरेसमोर कामे दिसू लागतात. तमाम “पुरुषांचा” परत चाकरमानी आणि श्रमिक होतो!
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023