अळूवडी..
“आई ,उद्या अळूवडी कर प्लिज, उद्या माझा महत्वाचा पेपर आहे” तिच्या कानात अमेयचा आवाज घुमला.अमेयच्या आयुष्यातील सगळ्या महत्वाच्या क्षणी त्याला आईच्या हातची अळूवडी लागायचीच. मग अगदी शाळेतला पहिला दिवस, मग नंतर मुंज, बोर्डाचे पेपर्स, डिग्रीचा शेवटचा पेपर, नोकरीतील पहिला दिवस ते अगदी लग्न या सगळ्या महत्वाच्या प्रसंगी आईच्या हातच्या अळूवडीने अमेयच्या नव्या मार्गावरच्या प्रवासाची सुरुवात व्हायची.
“डाळीचं पीठ कसं सगळीकडे सारख लागलं पाहिजे, चिंचेच्या कोळाचं प्रमाण योग्य हवं म्हणजे अळू खाजवत नाही” प्रत्येकवेळी अळूच्या वड्या करताना आईच्या सूचना तिच्या मनाच्या बॅकग्राऊंडला वाजायच्या आणि मग अळूवड्यांचा खमंग दरवळ सुटायचा.
काही दिवसांपूर्वी तिच्या आयुष्यात तिने खूप मोठा निर्णय घेतला, तो निर्णय अमेय-मधुरासमोर (अमेयची बायको) जाहीर करताना तिने तिची खास अळूवडी बनवली, पण निर्णय ऐकल्यावर अमेयने वड्यांची ताटली जोरात दूर सरकवून दिली.तो रागात बोलला
“आई, असा कसा विचार करू शकतेस तू? तुला सांभाळायला आम्ही कुठे कमी पडलो का म्हणून तू असा विचार केलास?? अग लोकं काय म्हणतील याचा तरी विचार करायचास!! इतकी वर्षे नाही घेतलास हा निर्णय!! मग आता काय झालं एकदम!!”
अमेयने तिच्या हातची अळूवडी नाकारावी नव्हे झिडकारावी हे पहिल्यांदाच घडलं.अमेयच्या वाक्यांनी तिच्या मनाला हजार इंगळ्या डसल्या तिला तिच्या मुलाला जोरजोरात ओरडून सांगावंसं वाटलं.
“अरे इतकी वर्षे काढली रे एकट्याने, आता सोबतीची गरज भासतेय तर काय चुकलं माझं.तू नाही रे मीच कमी पडले तुला वाढवण्यात”
मधुरा मात्र शांत व संयतपणे रिऍक्ट झाली , तिच्या सासूच्या निर्णयावर, तिकडे संजयच्या मुलीने देखील सगळं समजून घेतलं.
संजय आणि ही कॉलेजचे मित्रमैत्रिणी. मधली काही वर्षे कोणाशी कसलाच संपर्क नाही पण दोन वर्षांपूर्वी ही दोघे भेटली.कॉलेजमधली मैत्री पुन्हा खुलली.संजयच्या बायकोला कॅन्सरने गाठलं आणि काही वर्षांपूर्वी ती इहलोकी निघून गेली.हिचा नवरा म्हणजे महेश अमेय 7 वर्षांचा असताना देशासाठी शहीद झाला.महेश नेहमी म्हणायचा हिला
“मी अचानक कधी गेलो तर तू दुसरं लग्न नक्की कर”
पण तेव्हा अमेयची खूप मोठी जबाबदारी होती हिच्यावर. अमेय मोठा झाला, कमावता झाला, त्याने प्रेमविवाह करून मधुरासारखी गोड मुलगी (सून नव्हे) घरात आणली.मधल्या काळात हिला संजय भेटला, दोघांच्याही मनात प्रेमभावना अंकुर धरत होती.जोडीदाराची गरज भासतेच, या वयात विशेष भासते आणि मग दोघांनी आपापल्या घरी हा निर्णय जाहीर करायचं ठरवलं.
अमेय शेवटपर्यंत राजी झाला नाही.पण दोन दिवसांपूर्वी काही जवळच्या लोकांच्या साक्षीने संजय आणि हिने कोर्टात रजिस्टर पद्धतीने विवाह केला.लग्नाला अमेय आला नाही पण मधुराने मात्र हजेरी लावली.आज नविन घरी गृहप्रवेश होता.
देवाजवळ तिने दिवा लावला. मनापासून नवी आयुष्यासाठी प्रार्थना केली.
इतक्यात दाराची बेल वाजली. तिने दार उघडल तर संजयची मुलगी आणि हिची सून म्हणजेच मधुरा दारात हजर.
“अभिनंदन आणि मी तुम्हाला आजपासून आई म्हणणार आहे” संजयची मुलगी तिला मिठी मारत उत्तरली. हिला तिची आणि संजयच्या मुलीची पहिली भेट आठवली. संजयच्या मुलीने हिला तिच्या वडलांची नवीन साथीदार म्हणून स्वीकारलं असलं तरी तिची आई म्हणून स्वीकारलं आहे की नाही याबाबतीत संभ्रम होता
संजय म्हणाला
“तेही होईल काही दिवसांत, थोडा वेळ लागेल पण होईल” आणि आज तेच झालं.
तेवढ्यात मागून मधुरा आली आणि म्हणाली-
“आई, हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय? पहिल्यांदाच ट्राय केलंय हं,चुकभुल देणे घेणे. बघा चव घेऊन”
आणि मधुराने सोबत आणलेला डबा उघडला, ही पाहते तर काय!!! अळूवड्या. हिच्या डोळ्यात पाणी तरळलं.मधुराला ती सून न मानता मुलगी का मानते याचं उत्तर तिला पुन्हा एकदा मिळालं.
मग पुढे काय म्हणून विचारता!! खमंग अळूवड्यांसोबत नवीन नात्यांचा दरवळ सगळीकडे पसरला हे काय वेगळं सांगायला हवं??
Image by andreas N from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019
सर्व कथा मस्तच
zakas
मस्त.
छानच