तिरकिटधा….
आर्य वय वर्षे सहा.
अंगात प्रचंड एनर्जी.
या एनर्जीचा निचरा झाला नाही, तर तो प्रचंड अस्वस्थ व्हायचा.
रडारड.
हट्ट.
फेकाफेक.
‘क्या खाके पैदा किया था ईसे ?’
आईबापांना प्रश्न पडायचा.
चारचौघात कुठं घेवून जायची लाज वाटायची.
त्याची कधी सटकेल , काही नेम नसायचा.
पण गेले सहा महिने.
गाडी रूळावर आलीय.
विनायकराव.
आर्यचे आजोबा.
तबलानवाझ म्हणून ओळखले जायचे गावात.
गेली पंचावन्न वर्षे.
नाद करायचा नाय…
आर्यच्या आजोबांनी एकच नाद केला.
तबल्याचा.
वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षांपासून, तबला वाजवायचे.
हातात जादू होती त्यांच्या.
त्यांच्या दणकट हातांची थाप तबल्यावर पडली की..
थरथराट.
अनामिक आनंदांच्या लहरी श्रोत्यांना, आतपासून हलवून टाकत.
गावात कोणताही मोठा गवैय्या येवू देत.
सोबतच्या लवाजम्यात तबलजी नसे.
विनायकरावांची साथ असली की..
मैफल दणकेबाज.
सगळ्या गायकांशी त्यांचे सूर जुळले.
पण…
व्यवहाराशी सूर काही जमला नाही त्यांचा.
वेळीअवेळी मैफली.
गावातल्या पोरांना फुकट तबला शिकवणं.
काळवेळेचं भान हरपणं.
सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र कशा नांदणार ?
नाहीच नांदल्या ईथं तरी.
पुण्या मुंबैहून आॅफर्स यायच्या.
पण हा माणूस गाव सोडून, कधी बाहेर पडलाच नाही.
मैफलींपायी नोकरीत धड लक्ष नाही.
कसाबसा त्यांच्या बायकोनं संसार केला.
अर्थात विनायकरावांना मनसे समजून घेतलं तीनं.
कलाकार माणूस.
कलंदर असायचाच.
निदान त्याच्या बायकोनं तरी, त्याचं बेताल वागणं समजून घ्यायला हवं.
तीन बिचारीनं कधीच तक्रार केली नाही.
त्याच्याच तालावर नाचली आयुष्यभर.
विनायकराव तबल्याच्याच मस्तीत जगले आयुष्यभर.
रोहन.
विनायकरावांचा एकुलता एक मुलगा.
आर्यचा बाबा.
लहानपणापासून हे सगळं जवळून पाहिलेलं.
तबल्याचा ताल कधी समजलाच नाही त्याला.
ऊलट ,
तबल्याची तिडीक बसलेली डोक्यात.
या तबल्यानं, आपलं बालपण चिंधीचिंधी केलं असं वाटायचं त्याला.
तबल्याकडे पाठ फिरवून अभ्यास करायचा.
अंगात तीच रग.
तीच एनर्जी.
सगळी अभ्यासात जिरवली.
रोहन हुशार होताच.
मेहनतीची जोड.
स्काॅलरशीपवर शिकला.
ईन्जीनिअर झाला.
नोकरीला लागला.
पटाटा पुढे सरकत राहिला.
टेल्कोत मॅनेजर आहे सध्या.
मोठ्ठा फ्लॅट आहे चिंचवडला.
विनायकराव , त्यांची बायको…
गाव सोडून ईथंच आलेत कायमचे.
रोहन आईबापांचं बाकी सगळं ऐकतो.
त्यांना जीवापाड जपतो.
फक्त बापानं तबला कुटायचा नाही..
ह्या अटीवरच, दोघं म्हातारा म्हातारी ईथं आलेली.
तबल्याशिवाय जगणं विनायकरावांना फार जड गेलं.
पण काय करणार ?
‘तिरकीट धा’ या नव्या घराच्या कानावर, कधीच पडणार नाही बहुधा.
विनायकराव, फक्त आॅक्सीजनवर जगत होते वातावरणातल्या.
त्यांच्या जगण्याचा श्वास, तिकडेच विसरलेला तबल्याशेजारी.
पण नातवात जीव त्यांचा.
त्याचं सैरभैर वागणं.
आदळाआपट.
बेताल हट्ट.
त्याच्या आईबापांची तगमग.
विनायकराव सगळं बघत होते.
पारखी नजर होती त्यांची.
आर्यमधली एक्स्ट्रा एनर्जी ओळखली होती त्यांनी.
संजीवकुमार.
विनायकरावांचा जुना शिष्य.
ईथंच चिंचवडात तबल्याचे क्लासेस घ्यायचा.
सिलसिला सुरू झाला.
गुपचूप.
चोरी चोरी.
चुपके चुपके.
आर्यचा होमवर्क झाला की, विनावयकराव त्याला घेवून बाहेर पडायचे.
संजीवकुमारकडे.
एक तास रोज.
रोहन येईपर्यंत घरवापसी.
आर्यचा जीव तबल्यात रमला.
डोकं ताळ्यावर आलं.
शहाणपण अंगी भिनलं.
चळवळ कमी झाली.
टोपलीखाली झाकून ठेवण्याची गरज राहिली नाही.
ऊलट मिरवणेबल वाटू लागला.
आर्य बदल गया है !
टाॅप एनर्जी आऊटलेट मिळालेलं.
रोहनही आर्यवर खुष होता.
“बुवा , आर्यच्या बोटात जादू आहे.
तुमचंच रक्त भिनलंय.
तबल्यात करिअर करू दे त्याला.”
संजीवकुमार ऊवाच.
” त्याचा बाप , मला आणि त्याला दोघांनाही एकाच वेळी धुरी देईल.
कशाला ऊगाच वादावादी ?
पोरगं जरा शांत झालं की झालं.
पुढचं पुढे.
त्याचा बाप बघेल.”
एका रविवारी.
संजीवकुमार रोहनच्या फ्लॅटवर.
तशी दोघांची लहानपणाची ओळख.
संजीवकुमारांचा डायरेक्ट प्रश्न.
” तुझा मुलगा काय होईल असं वाटतं तुला ?”
रोहनचा मोठ्ठा पाॅज.
” पेट्रोलपंपावर पेट्रोल भरलं तरी चालेल , पण तबला कुटायचा नाही.”
अपेक्षित ऊत्तर.
” रोहन्या , तो जे काय होईल त्याला अजून वेळ आहे.
त्यानं आपल्या मनाला आवडेल ते करावं.
प्रश्न आत्ताचा आहे.
मला वाटतं , तो तबल्यात छान करिअर करेल.
त्याला मनापासून आवडतं ते.
तुला माहीत नसेल , पण मी सहा महिने तबला शिकवतोय त्याला.
ऐकून घे.
लगेच रिअॅक्ट होवू नकोस.
मी तुला समजून घेवू शकतो.
पूर्वीचा काळ राहिला नाही आता.
कलेत सुद्धा करिअर करता येतं रे.
माझ्याकडे बघ.
बुवांकडेच शिकलो मी.
अलंकार झालो.
मैफलीला जातो.
पार अमेरिकेतही.
‘वाजवून’ पैसे घेतो.
एरवी ईथं तबल्याचे क्लास घेतो.
तुझ्याएवढाच फ्लॅट आहे माझा.
तेवढाच फ्लॅट शेजारी आहे.
हाॅलमधे कन्व्हर्ट केलाय.
तिथं क्लास चालतो.
व्यवहार जमलाय की मला.
मी खूप खुष आहे माझ्या फिल्डमधे.
सध्या त्याला आवडतंय ना.
शिकू दे त्याला.
सहा महिन्यातला बदल तू बघतोयस.
मोठा झाला की , त्याचं त्याला कळेल.
फक्त त्याच्या आवडीचं करिअर त्याला करू दे.
चुकून त्याला तबल्याची वाट पकडावीशी वाटली तर , तू वाट अडवू नकोस.
चुकीच्या रस्त्यावरची फरफट जिंदगी बरबाद करते.
एवढा व्यवहार तुला कळतोच.
चल.
निघतो मी.”
रोहन हक्काबक्का.
पाच मिनटं.
शांतता मी म्हणत होती.
कुणीच काही बोले ना.
एकदम रोहन बोलला.
“संज्या , चांगला तबला कुठं मिळेल रे ?
लगेच घेवून येवू.”
तिरकीट धा !
Image by giselaatje from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
👌👌
👌
ग्रेट!!
Chhan
Mastch as usual
गोष्ट सांगण्याच्या तंत्रावर चांगलीच थाप बसली आहे तुमची !
nice
छान.वेगळी दीशा.
👌👌