सवाष्ण…
धडधडधऽऽऽऽऽ
आमोद त्याच्या स्टेनगनमधून, घमासान फायरिंग करत होता.
आखिर गोली निशाने पे लगी.
नील ऊताणा पडला.
आमोदनं मुठी आवळून सेलीब्रेट केलं.
अर्ध्या मिनटात नील ऊठून रडायला लागला.
‘दरवेळी मीच का मरून जायचं ?
या आम्याला कधीच कशा बुलेटस् लागत नाहीत ?’
नीलची कंम्पलेंट.
“बिकाॅज आय अॅम इंडियन सोल्जर.
अॅन्ड यू आर मिलीटंट..
अॅन्ड इंडियन सोल्जर नेव्हर डाईज..”
नील म्हणाला.
‘मग मी पण इंडियन सोल्जर होणार.’
ओक्के…
आमोदनं मग मामाला , नीलच्या बाबाला, मिलिटंट केला.
धाडधाड गोळ्या घालून संपवून टाकला.
तेवढ्यात..
फायरिंगच्या आवाजात आजीचा आवाज ऐकू आला.
‘बास झालं रे तुमचं फायरिंग.
चला जेवायला या’
आजीनं लाडानं फायर केलं.
मामासकट सगळे घाबरले.
खेळ संपला.
मोहिषा आजच सकाळी ईकडे आली.
तसं तिचं सासर पुण्यातच.
पाच सहा वर्ष पुण्याबाहेरच होती.
सागरचं पोस्टिंग दर दोन वर्षांनी बदलायचं.
पण नील शाळेत जायची वेळ आली अन्..
मोहिषा आणि सागरनं ठरवलं.
यापुढे मोहिषा आमोदला घेवून पुण्यातच राहिल.
त्याच्या आईबाबांकडे.
यावेळी सागर एकटाच तिकडे गेला होता.
राजौरीला.
काश्मीरमध्ये.
धुमसत्या बर्फाच्या खाईत..
आजीनं मोहिषालाच बोलावलं होतं आज.
सवाष्ण म्हणून….
अनायसे नवरात्रात पहिल्यांदाच, तिची लेक पुण्यात आलेली.
ती येणार म्हणून मामानं पण सुट्टी घेतलेली.
मामा , मामी , नील, आमोद , आजी, आबा….
नसती धम्माल.
सगळ्यांनी मिळून देवीची आरती केली.
आजीनं ओटी भरायची तयारी केली.
तेवढ्यात फोन वाजला..
कसाबसा आजीनं फोनवरच्याला कटवला.
पटकन स्वयंपाकघरात आली.
मोहिषाला हळद कुंकू लावलं.
तिची ओटी भरली.
तिला नमस्कार केला.
आमोद मन लावून बघत होता सगळं..
आजीनं आईला नमस्कार केला,अन् हसतच सुटला.
“आई बुढ्ढी झाली…
म्हणून आजीनं तिला नमस्कार केला.”
आजी खोटंखोटं रागावली.
‘चल हट.. अरे सवाष्णीचा मान असतो तो.’
आजीनं सांगितलेलं आमोदला टॅन्जंट गेलं.
“सवाष्ण म्हणजे काय ?”
नीलनं विचारलं.
‘ज्या मुलाचा बाबा , ब्रेव्ह , अन् लवेबल असतो ना ,त्याच्या आईला सवाष्ण म्हणतात..”
मामानं ऊत्तर दिलं.
हे मात्र दोघांना पटलं.
मग सगळे जेवायला बसले.
मोहिषाच्या , आमोदच्या ताटाभोवती मण्यांची रांगोळी.
बाजूला विड्याच्या पानावर दक्षिणा.
दक्षिणा मिळणार म्हणून आमोदचा मोगॅम्बो झालेला.
हात सुकेपर्यंत मंडळी टेबलाशी गप्पा कुटत होती.
चार वाजले.
मोहिषाची चुळबूळ सुरू झाली.
आमोदला नीलशी अजून खूप खेळायचं होतं..
पर…
मुँह लटकाके , आईचं बोट धरून आमोद घरी निघाला.
लेकिन फिरभी खुष था.
नील संडेला त्याच्याकडे येणार होता खेळायला.
मोहिषा जिना ऊतरली.
आणि घर एकदम रिकामं झालं.
नीलचं चॅनल एकदम म्युट.
आजी एकदम मटकन् खालीच बसली.
देवघरापुढे बसून घळाघळा रडायला लागली.
कुणालाच कळेना..
क्या हुवा ?
रडत रडत आजी म्हणाली..
” सागर गेला रे आपल्याला सोडून..
त्याची टीम राजौरीला आॅपरेशनवर होती.
चार जणं एका घरात लपून बसले होते.
चार तास फायरिंग चाललेलं..
तीन मारले गेलं..
चौथा पण…
पण…
जाता जाता त्यान मारलेली गोळी सागरला घेवून गेली रे..
खूप लांब…”
आजी कंटिन्यूअसली रडतच होती.
सगळेच एकदम टेन्स झाले.
नील सुद्धा.
” मगाशी फोन आला,
तो हीच न्यूज घेवून..
माहित होतं रे मला…
तरी सुद्धा पोरीची सवाष्ण म्हणून ओटी भरली..
पोरीची माया आड आली.
देवीसुद्धा कदाचित रागवेल माझ्यावर.
वाटलं, ती बातमी तिला तिच्या घरीच कळू देत.
सवाष्ण म्हणूनच पाठवणी केली तिची.”
नीलला कळेना देवी का रागवणार म्हणून ?
“आजी तुझं बरोबर आहे.
यूनो , इंडियन सोल्जर नेव्हर डाईज ..”
नील सहज म्हणाला.
“खरंय रे बाळा..
सैनिकाची बायको सदैव सवाष्णच असते”
आजी नीलला मांडीत घेवून पुन्हा रडायला लागली..
आजीच्या अश्रूंनी नीलचे गाल ओलेचिंब झाली.
आठवणींच्या ‘सागरा’त सगळं घर बुडून गेलं..
Image by Amber Clay from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
खरं आहे. Very touching…