स्वप्न- उन्मेष खानवाले
मी मागे वळून पाहिलं आणि ….. माझ्या मागे आज सुद्धा….
ताणली गेली ना उत्सुकता ? कुठल्याही कथेला अशी एक आकर्षक सुरुवात असली की वाचक कसा त्यात गुंगून जातो. मी एक गोष्टीवेल्हाळ माणूस आहे. मला कथा सांगायला खूप आवडतात. आजदेखील मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे. कथा वाचून ती सुखद आहे की दुःखद हे तुमचं तुम्ही ठरवा. माझ्या या कथेत एकूण ३ मुख्य पात्रं आहेत – माझी बायको रेवती, आमचे फॅमिली डॉक्टर गुप्ते आणि अर्थातच मी!
कथेला सुरुवात करण्याअगोदर थोडीशी पार्श्वभूमी. मी, स्वानंद बोकील एक सर्वसाधारण नोकरदार माणूस आहे. आमच्या घरांत आम्ही दोघेच – मी आणि माझी बायको रेवती. आमच्या लग्नाला आता जवळपास १० वर्षे झाली आहेत. हो, तुम्ही बरोबर ओळखलंत. लग्नाच्या इतक्या वर्षांनीसुद्धा अजून आम्ही दोघेच आहोत. यासाठी आम्ही ट्रीटमेंट देखील घेत आहोत. पण एक सांगू, ट्रीटमेंट फक्त एक बहाणा आहे. मला केव्हाच कळून चुकलंय की, रेवतीला मूल देण्यात मीच असमर्थ आहे. रेवती मनातून खूप दुःखी आहे पण तसं ती मला कधीच जाणवू देत नाही.
तर ही झाली माझ्या कथेची पार्श्वभूमी. आता मूळ कथेला सुरुवात करतो. गेले कित्येक दिवस मला रोज रात्री एक स्वप्न पडतंय. मी शहराच्या मुख्य रत्यावर चालतोय, अगदी एकटा. भर दिवसाची, टळटळीत उन्हाची वेळ असूनसुद्धा रस्त्यावर एक चिटपाखरू देखील नाहीये. रहदारीचा गोंगाट नाही, वाहनांचे आवाज नाही. तो रस्ता अगदी निर्मनुष्य आहे. मी माझ्याच तंद्रीत चालत असतांना अचानक एक खोल आवाज मला जागं करतं. कोणी अगदी कळवळून बोलवतंय, हाक मारतंय असा तो आवाज मला ऐकू येतो. मी मागे वळून बघतो आणि…मला नेहमीसारखं तेच दृश्य दिसतं. रत्यावर एक तान्ह बाळ आहे. ते माझ्याकडे रांगत येण्याचा प्रयत्न करतं. हातापायांच्या काड्या झालेल्या, डोळे खोल गेलेल्या त्या बाळाला बघून माझा जीव कळवतो. त्याच्या नजरेतले करुण, आर्त भाव मला हेलावून सोडतात. मी त्याच्याकडे धावतो पण हळूहळू त्याचं शरीर विरळ होत जातं आणि मग ते अदृश्य होतं.
शेवटी एक दिवस सकाळी उठल्यावर मी हे स्वप्न रेवाला सांगितलं. त्या बाळाचं केलेलं मी वर्णन ऐकून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिने हुंदका दाबला. अशा गोष्टी रेवाला सांगितल्यावर तिला किती त्रास होतो हे माहित असूनसुद्धा मी तिला याबद्दल सांगितलं.
“आलेच मी चहा घेऊन”, आपला चेहरा लपवण्यासाठी ती उठून आत गेली.
हे तिला मी सांगायला हवं होतं का नाही ते मला कळलं नाही. काही गोष्टी खरंच जवळच्या माणसाला सांगता येत नाही. कारण त्यातून मग ती व्यक्ती आपल्याबद्दल लगेच बरेवाईट तर्क काढते. अशावेळी बोलण्यासाठी एक तटस्थ व्यक्ती हवी. कुठल्याही प्रकारचे पूर्वग्रह न ठेवता ती व्यक्ती शांतपणे आपले बोलणे ऐकून घेते. माझ्यासाठी मन मोकळं करायला आता एकच आधार होता, आमचे फॅमिली डॉक्टर गुप्ते. डॉ. गुप्ते एक निष्णात डॉक्टर होते. ह्युमन सायकॉलॉजीचादेखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. मुख्य म्हणजे त्यांचा हसमुख, बोलका स्वभाव. डॉक्टर अविवाहित होते. पंचेचाळीस-पन्नास वर्षांचे डॉक्टर आजही तिशीतले वाटावे इतके फिट होते.
“कसं आहे मिस्टर बोकील. मानसशास्त्र हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. आपल्या अंतर्मनात बऱ्याच घटना घडत असतात त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. तुम्हाला पडणारे स्वप्न हा त्याचाच एक भाग आहे. तुम्ही निपुत्रिक असणं हे कुठेतरी खोल तुमच्या अंतर्मनावर कोरलं गेलं आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या स्वप्नावर होतो. Nothing to worry about!”, डॉ गुप्त्यांनी माझी समजूत काढली.
पण डॉक्टरांच्या या खुलाश्याने माझ्या अंतर्मनाचे काही समाधान झाले नाही कारण तेच स्वप्न मला सारखे रोज पडत होते. काही दिवसांनी मी त्याची वाच्यता करणं बंद केलं एवढंच. गेले काही दिवस रेवात मात्र खूप बदल झाला होता. आजकाल तासंतास ती अबोल असायची. काही विचारलं तर डोळ्यातून अश्रूंची धार लागायची. कुशीत येऊन फक्त रडायची. तिच्या अशा वागण्याने मला अजून अपराधी वाटू लागलं. एखादं दत्तक मूल घेऊया का असं विचारल्यावर ती नको म्हणाली.
असेच काही दिवस गेल्यावर रेवा अचानक एक दिवस घरातून बेपत्ता झाली. बराच शोध घेतला पण काही दिवसांनी मिळालं ते तिचं निष्प्राण शरीर! वर्सोवा बीचजवळ तिची बॉडी मिळाली. किती भेसूर दिसत होती माझी रेवा! तिच्या गळयावर काळे निळे डाग उमटले होते. कोणीतरी गळा आवळून मारल्याचे ते व्रण होते. खून? रेवाचा? कशासाठी पण? पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यावर मला धक्का बसला. रेवा १ महिन्याची गर्भवती असताना तिने काही दिवसांपूर्वीच गर्भपात केला होता. ज्या सुखासाठी आम्ही रात्रंदिवस तळमळत होतो ते मिळणार असतांना रेवाने असं का केलं ??
मला जेवढे प्रश्न पडले तितकेच पोलिसांना देखील पडले. पोलिसांना माझ्यावरच संशय होता. माझी चौकशी झाली. कित्येक दिवस मला डांबून ठेवलं पण शेवटी त्यांना पुराव्याअभावी माझी सुटका करावी लागली. गंमतीची गोष्ट म्हणजे त्या दिवसापासून माझ्या स्वप्नांत देखील बदल झाला. आता स्वप्नांत मला रोज रेवा दिसू लागली. स्वप्नांत मी मागे वळून बघितल्यावर मला रस्त्यावर उभी असलेली रेवा दिसायची. ते रांगणारं, तान्ह बाळं स्वतःच्या कडेवर घेतलेली रेवा. तिच्या आठवणींनी आता जीव वेडापिसा व्हायचा.
“मला मदत करा डॉक्टर. मला वेड लागतंय हळूहळू. मला आता भ्रम आणि वास्तव यातला फरक कळेनासा झालाय”, मी पुन्हा डॉक्टर गुप्त्यांना भेटून विनंती केली.
“बोकील, अहो मी सांगितलं ना , हे सगळे मनाचे खेळ आहेत. मन आणि त्याच्या अमर्याद शक्ती यावर अजून संशोधन सुरु आहे. शरीराच्या वासना मृत्यूने मरतात पण मनाच्या अतृप्त वासनांचे काय ? याकडे सध्या विज्ञानाकडे सुद्धा उत्तर नाहीये. शेवटी विज्ञान म्हणजे काय तर आपण आतापर्यंतचे मिळवलेले ज्ञान. उद्या काही नवीन संदर्भ, नवीन शोध आपले आजचे तर्क कालबाह्य होतील. मी तुम्हाला काही औषध लिहून देतो ती घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. “, डॉक्टर माझी पुन्हा नेहमीप्रमाणे समजूत काढतात.
त्या रात्री झोपेत असतांना मला पुन्हा तेच स्वप्न पडलं. यावेळी कडेवर बाळाला घेऊन उभ्या असलेल्या रेवाला बघितल्यावर मी तिला हाक मारली तेंव्हा तिने माझ्या नजरेत एकदा बघितलं आणि ती चालू लागली. यावेळेस ती नेहमीसारखी अदृश्य झाली नाही. तिची ती खोल, अथांग नजर, संमोहित झाल्यासारखा मी तिच्या पाठोपाठ चालू लागलो. चालत चालत मी एका जागेपाशी आलो. ती जागा माझ्या ओळखीची होती. मी विचार करत असतांना ती बाळासह अदृश्य झाली.
स्वप्नातून मी भानावर आलो. रेवा मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेय का? तिच्या झालेल्या खुनाबद्दल सांगण्याचा प्रयत्न ? असंख्य प्रश्नांचा भुंगा माझं डोकं पोखरू लागतो. मी तडक डॉ.गुप्तेकडे जायला निघालो. त्यांच्या क्लीनिक मध्ये शिरताना मला यावेळी थोडं विचित्र वाटतं. अरे हो, स्वप्नांत रेवा इथेच तर घेऊन आलेली मला.
माझं स्वप्न सांगितल्यावर डॉक्टरांचा चेहरा निर्विकार होता. जणू त्यांना या गोष्टीची पूर्वकल्पना होतीच. ते शांतपणे आपल्या खुर्चीतून उठले आणि त्यांनी आपल्या केबिनचा दरवाजा बंद केला.
“well मिस्टर बोकील, मला माहित होतं कि रेवती गर्भवती होती. आणि अर्थातच ते सगळ्यात अगोदर मला कळलं होतं. ते मला आधी का कळलं असेल याचं स्पष्टीकरण द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. ट्रीटमेंटच्या निमित्ताने आम्ही वरचेवर भेटत होतो आणि मग पुढे I hope you understand. तिच्या अपेक्षा वाढू लागल्या. घर, संसार वगैरे बुलशीट मग नाईलाजाने मला आवश्यक पावले उचलावी लागली.”, डॉक्टरांनी ग्लोव्हस घालत सगळ्या गोष्टी लक्ख सूर्यप्रकाशात आणल्या. कोणीतरी तप्त वितळलेले शिसे माझ्या कानांत ओततंय असं मला जाणवत होतं.
माझ्या तोंडून शब्द फुटला नाही. विश्वासघात, संताप, दुःख अशा सगळ्या भावना मनात दाटून आल्या आणि मग मी तिथेच खुर्चीवर कोसळलो.
“मिस्टर बोकील, तुम्ही खूप थकलाय आणि तुम्हाला सध्या थोड्या विश्रांतीची गरज आहे. तुम्ही थोडी विश्रांती घ्या”, असं म्हणत डॉक्टरांनी हळूच एक इंजेक्शन माझ्या दंडात रुतवलं. खूप दुरून ऐकल्यासारखे डॉक्टरांचे शब्द मला ऐकू आले. हळूहळू मला गाढ झोप येऊ लागली. आजूबाजूला काळामिट्ट काळोख पसरला. मला अगदी गाढ झोप लागली. आश्चर्य म्हणजे त्या रात्री मला कुठलेच स्वप्न पडत नाही.
———-
“अहो उठा, किती वेळ झोपलात आज ? ऑफिसला उशीर नाही का होणार?”, रेवाने सकाळी मला उठवलं.
मी आळसावून उठलो. माझ्या समोर माझी रेवा उभी असते. अगदी तशीच किंबहुना अधिक मोहक, सुंदर.
“आता थोडं जबाबदारीने वागायला शिका. कळलं का काही?”, रेवा माझ्याकडे बघून सूचक हसते.
“म्हणजे मी ? आपण ?”, मी हर्षभरित होऊन रेवाला घट्ट मिठी मारतो.आमच्या इतक्या वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं.
मला कधी एकदा डॉक्टरांना भेटतो असे झाले होते. कशीबशी तयारी करून मी डॉक्टरांच्या भेटीला निघालो. भर दिवसा, इतक्या सकाळी रत्यावर आज अगदी शुकशुकाट होता. भर दिवसाची, टळटळीत उन्हाची वेळ असूनसुद्धा रस्त्यावर एक चिटपाखरू देखील नाहीये. रहदारीचा गोंगाट नाही, वाहनांचे आवाज नाही. तो रस्ता अगदी निर्मनुष्य आहे.आज संप तर नाहीये ना ? मी गाडी पार्क करून सरळ डॉक्टरांच्या केबिन मध्य शिरलो.
“डॉक्टर, आज माझ्या आणि रेवाच्या आयुष्यातला एकाकीपणा गेला”, मी हर्षभरित होऊन बोलत होतो पण डॉक्टरांचा चेहरा सुन्न पडला होता. कुठल्यातरी भयानक शॉकमध्ये असल्यासारखे वाटत होते.
“हे कसं शक्य आहे? मी काल तुला गुंगीचं इंजेक्शन दिल्यावर…..माझ्या या हातांनी मी तुझा गळा…… आजच्या पेपरमध्ये सुद्धा त्याबद्दल बातमी आलीये”, वेदनेची एक सूक्ष्म कळ डॉक्टरांच्या छातीत उतरत होती आणि बोलता बोलता ते अचानक कोसळले.
मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या हातातल्या पेपरमधली बातमी वाचू लागलो. पेपरमध्ये माझ्या आकस्मिक मृत्यूची बातमी माझ्या फोटोसकट छापली होती. फोटो माझाच होता पण माझ्या त्या फोटोत माझ्या गळ्यावर काळे-निळे पडलेले बोटांचे ठसे उमटले होते अगदी तसेच जे माझ्या रेवाच्या मानेवर आहेत.
———
तर हि आहे माझी कथा. सध्या आम्ही तिघे अगदी आनंदाने एकत्र राहतोय. आमच्या एकाकी संसाराची उणीव आता भरून निघालीये. आणि मुख्य म्हणजे सध्या मला कुठलेच स्वप्न देखील पडत नाही.
– उन्मेष खानवाले.
Image by Pete Linforth from Pixabay
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
मराठीत वाचलेल्या आणि आवडलेल्या गुढकथांमधली एक. छान लिहीलीये. 🙂
छान कथा. शेवटचा धक्का मस्तच! आवडली.
👌