पत्र क्रमांक ९ आणि १०
पत्र क्रमांक 9,
प्रिय रमाई,
‘तुझी खाण्यापिण्याची अबाळ होत नाही’ हे सर्वात सुखद वाक्य होतं. आज रविवार मग सुट्टी असेल ना?आज काय प्लॅन? नवीन मित्रमैत्रिणी तुला मिळालेच असतील, तशी तू बडबडी आहेसच, त्यामुळे तुझी कोणाशी मैत्री व्हायला वेळ लागत नाही.
तुला माहित्ये रमाई, तुझे आजोबा थोडे कर्मठ विचारांचे होते. मला दिवस गेले तेव्हा घराण्याचा वारसदारच जन्माला यावा म्हणून ते देवीला प्रदोष करायचे (विरोधाभास बघ नं) मीही यांच्या स्वभावाला घाबरून मुलगाच होऊ दे म्हणून देवीला गायीच्या तुपाचा दिवा लावायचे…मी सुदैवाने (त्यांच्या की माझ्या माहीत नाही) दोन्ही मुलंच जन्माला घातली…पण दुसऱ्या वेळेस मला मुलगी व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती..पण ती काही पूर्ण झाली नाही.. तुझ्या आजोबांचा स्वभाव नंदाच्या म्हणजे तुझ्या आईच्या दिवस राहिल्याच्या काळातही बदलला नाही…त्यातुन कळलं की जुळ होणार ..मग तर काय सगळ्यांच्या आनंदाला उधाण आल..नंदाच्या वेळेस मात्र त्या जुळ्यांमध्ये एक तरी मुलगी व्हावी यासाठी मी मनोमन प्रार्थना करत होते..कुठल्या कुठल्या देवांना नवसही बोलत होते…का माहित्ये? एकतर मला मुलगी नाही त्यामुळे मुलीशी असणार ते नातं मला अनुभवता आलं नाही..नंदेच्या वाट्याला ते येऊ नये असं वाटत होतं… मुली मोठ्या झाल्या की आईची आई बनतात गं.. रोजच माहेरी आहोत असं वाटतं… हे नातं वेगळंच गं.. कितीही काहीही म्हण ही भावना मुलांच्या बाबतीत येत नाही (हे लिहिताना गौतम माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहतोय)
तर तुमच्या जन्मानंतर मात्र तुझ्या आजोबांचा स्वभाव बदलला…त्यांनी गौतमपेक्षा तुझे लाड जास्त केले यावरून गौतम अजूनही चिडचिड करतो .तू आलीस आणि आपल्या घरात दोन पिढ्यानंतर लक्ष्मीची पावलं आली…मला तुझं नाव रमाई ठेवायचं होतं पण सगळ्यांची त्या नावाला पसंती नव्हती मग तुम्ही नाव काहीही ठेवा मी रमाई म्हणूनच बोलवेन असं ठरलं…तुम्ही दोघ दिसायचात अगदी सारखे पण स्वभाव खूप निराळे..तुमच्या बालपणाविषयी लिहायचं म्हणजे ग्रंथ होईल…काय भरभर मोठे झालात तुम्ही आणि तू अशी भुरक्कन निघून गेलीस बंगलोरला. मी नक्की येईन तुला भेटायला बंगलोरला. तू मागच्या पत्रात बंगलोरच जे वर्णन केलं आहेस ते वाचून मी मनाने कधीच बंगलोरला पोचलेय. तिथे आले की तुला निर डोसा खायला घालेन आणि येताना खोबऱ्याच्या वड्या पण घेऊन येईन आणि मी काही नवसबिवस फेडायला गेले नव्हते, मुळात तुला पिरियड्स यावे म्हणून आम्ही सगळे इतका आटापिटा का करत होतो हे तू पूर्णपणे समजून घ्यावसच अशी अपेक्षा करत नाही मी कारण तूला उद्या मूल झालं की हे आपोआप समजेल अस मला वाटतं …’झालं आज्जीने ठेवणीतला डायलॉग मारला’…हेच म्हणतेयस ना मनात?म्हण बापडी.
नंदेलाही पत्र लिही ..ती वाट बघतेय गं.. हो बाई मीच बोलतेय असं… आमच्यात मतभेद आहेत गं (जसे बहुतांश घरातल्या सासू सुनेत असतात) वैर नाही.
काळजी घे..नीट रहा
तुझी ,
आज्जी
†******************************
पत्र क्रमांक 10,
प्रिय गार्गी,
उद्या आपला वाढदिवस, Happy Birthday ,अर्थात उद्या आपला व्हिडिओ कॉल होईलच. तू आजीलाही पत्र लिहिलं होतंस त्या पत्राचं उत्तर आजीने माझ्याकडून लिहून घेतलं …तुला अक्षरावरून लक्षात येईलच आणि त्यात आजीने माझ्या शुद्धलेखनाच्या चुका पुन्हा काढल्या..त्यामुळे ते पत्र शुद्धलेखन प्रूफ आहे पण ह्या पत्रात तशी अपेक्षा करू नकोस. पण या पत्र पत्र खेळामुळे आजीचं उत्तर लिहिताना मला तिचे अँगल समजले.
तुझ्या मागच्या पत्रात आपल्या लहानपणीच्या आठवणींचा उल्लेख होता , ते वाचून छान वाटलं. तू इथे आलीस की गोळा खायला जाऊ आपण परत.
माणसं अभ्यासणं मला आवडतं पण माझी माणसांची निवड मात्र प्रत्येकवेळी बरोबरच असते असे नाही. एकतर अभ्यास कमी पडत असावा नाहीतर माझी फक्त थिअरी पक्की असावी..प्रॅक्टिकल शून्य… तू मागच्या पत्रात समायराबद्दल विचारलस तर सांगतो तिचं आणि माझं 1857 साली ब्रेकअप झालं..का झालं? कसं झालं? या प्रश्नांची उत्तरं आत्ता देणार नाही आणि तुझा तो वायझेड मिहीर ..त्याला मी पहिल्यांदा भेटलो तेव्हाच समजलं होत मला की हा पुढे जाऊन कच खाणार..त्याच्या बाबतीतले रिडींग मात्र चुकू दिलं नाही त्याने.पण तू त्याच्या प्रेमात होतीस…तुला आठवतं मी तुला बोलूनही दाखवलं होतं हे…त्याच्याकडे डिसीजन मेकिंग अजिबात नाहीये…असो..त्याचा विषय मी काढला नसता पण तुला हेच सांगायचं होतं की तुला मिहीर प्रकरणात जो मनस्ताप झाला..आई बाबांना, आजीला जो मनस्ताप झाला ते मला अजिबात आवडत नव्हतं..म्हणून मी त्या मिहिरला नंतर भेटून त्याची लायकी दाखवून दिली (फक्त शाब्दिक मारामारी केलीय..काळजी नसावी)…मी त्याला नंतर भेटलो हे मी कोणालाही सांगितलं नाही..तुलाही आत्ता सांगतोय..तशीही प्रत्येक गोष्ट बोलून दाखवण्याचा किंवा सांगण्याचा माझा स्वभाव नाही हे तूला माहीत आहेच.
तुला गेल्या 4-5 वर्षात खूप मनस्ताप झालाय त्यामुळ ट्रीटमेंटला यश आल्यानंतर तुझा बंगलोरला जाण्याचा निर्णय मला खूप पटला ..आवडला..माझं म्हणणं आहे की तुला वाटेल/ पटेल तेव्हाच लग्न कर .त्या आधी आई/बाबा/आज्जी तुझया लग्नासाठी कितीही वेडे झाले तरी तू तुझ्या मनाचं ऐक.
आज बऱ्यापैकी गोड बोललो आपण एकमेकांशी …तर आजचा कोटा संपला..चल आता प्रॅक्टीसला जायचंय..गोरे सरांना एक मिनिट उशिर झालेला चालत नाही.चल बाय.
आणि हो एक लक्षात ठेव मी तुला कधीच ताई म्हणणार नाही
तुझा (खडूस) भाऊ
गौतम
Image by Ralf Kunze from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019