आई नावाचे करियर…

 
एमिली नावाची एक बाई एकदा तिच्या लायसन्सच्या नूतनीकरणाकरता सरकारी ऑफिसात गेली. ऑफिसातल्या कर्मचारी बाईने तिला तिचा व्यवसाय विचारताच, एमिली थोडीशी संकोचली, कारण तिला “पेशा” या रकान्याखाली काय लिहावं ते नक्की समजेना. कार्यालयातील बाईने विचारलं, “म्हणजे मला असं विचारायचंय की तुम्ही नक्की काम काय करता? की तुम्ही नुसत्याच…. यावर एमिली चटकन म्हणाली, “अर्थातच मी काम करते. मी आई आहे.” “आई हा काही पेशा नाही, मी गृहीणी असं लिहिते” ऑफिसातली बाई म्हणाली.
   
मी हि गोष्ट अगदी पुरती विसरले होते. पण एक दिवस मात्र मला स्वतःलाच या प्रसंगाला तोंड द्यायची वेळ आली.
 
माझ्यासमोर ऑफिसातल्या खिडकीमागे बसलेली बाई अगदी व्यवस्थित “नोकरीवाली करीयरिस्ट बाई” दिसत होती. कार्यक्षम, आत्मविश्वासू आणि बहुधा तिला तिच्या नावाची “सरकारी कार्यालयातील अमुक अमुक कर्मचारी” अशी पाटी असल्याची बराच अभिमानही होता.
“आपला व्यवसाय?” तिने किंचितश्या कुत्सिततेने मला विचारलं. त्याक्षणी मला समजलं नाही मला नक्की काय झालं ते, पण अचानक हे शब्द माझ्या तोंडून निघून गेले. “मी बालविकास आणि मनुष्यांमधील परस्पर संबंध यांच्याशी निगडीत असलेल्या एका संशोधन आयोगात काम करते.” 
 
ती बाई थबकली, तिचं पेन जागच्या जागी थिजल्यासारखं झालं, आणि तिने माझ्याकडे असं काही पाहिलं, की तिने काहीतरी चुकीचे ऐकले असावं. मग मी सावकाश, प्रत्येक महत्त्वाच्या शब्दावर व्यवस्थित जोर देत, तिला परत सगळं सांगितलं. मनातल्या मनात खिदळत, माझे शब्द त्या फोर्मवर छोट्याश्या रकान्यात लिहितानाची तिची गडबड बघत मी मजा घेत होते. 
“मी तुम्हाला विचारू शकते का, की तुम्ही तुमच्या संस्थेत नक्की काय काम करता?” त्या बाईने मला उत्सुकतेने पण तितक्याच सावध आवाजात विचारले. किंचितही संकोच नसलेला आणि आत्मविश्वासाने भारलेला असा स्वतःचाच आवाज मला ऐकू आला. “मी एका प्रयोगशाळेत दीर्घकालीन संशोधन कार्य चालवते (कोणती आई हे चालवत नाही?) आणि (घरामध्ये आणि घराबाहेरही) फिल्ड वर्क करते. मी सध्या माझ्या डॉक्टरेटवर काम करते आहे (अर्थात कुटुंब व्यवस्थापक म्हणून काम करता करता) आणि आत्तापर्यंत मला चार पुरस्कार (चार मुली) मिळाले आहेत. हे सगळ कधीकधी अतिशय आव्हानात्मक असू शकतं आणि मी दिवसातले चौदा तास काम करते (खरंतर चोवीस तासही पुरे पडत नाहीत!!) हे काम जगातल्या सर्व अर्थव्यवस्थेतल्या करियरपेक्षा नक्कीच एक प्रचंड मोठ आव्हान आहे पण या कामाला मिळणारा मोबदला पूर्ण जगातल्या श्रीमंतीपेक्षा खूप खूप आनंद आणि समाधान देणारा आहे. 
 
त्या ऑफिसातल्या बाईच्या नजरेत माझ्याबद्दलचा आदर वाढला हे मला लगेच समजलं, इतका की ती मला अगदी दारापर्यंत सोडायला आली. 
 
परत येताना मी खूप आनंदात होते आणि माझ्या अत्यंत आकर्षक अश्या नोकरीबद्दल विचार करत होते. माझ्या घराच्या पार्किंगमध्ये मी जेव्हा गाडी  नेली तेव्हा माझ्या प्रयोगशाळेतल्या १३, ७ आणि ३ अश्या वयवर्षाच्या माझ्या सहकाऱ्यांनी माझ स्वागत केलं. जवळूनच मला आमच्या बालविकास विभागातील नवीन संशोधनाचा नमुना (६ महिन्याचा आणि साखरेहून गोड असलेला!!) अबकड ची बडबड करताना ऐकू येत होता.
मला खूप आनंद झाला. अखेर नोकरशाहीला मी जिंकलं होतं!! आणि मी आता कोणाच्या तरी फायलीत कोणीतरी खूप महत्त्वाची आणि “फक्त आई”पेक्षाही जास्त कोणीतरी होते.  
             
आई : काय विलक्षण करीयर आहे!!
 
पण मग असं असेल तर सगळ्या आज्या या बालविकास आणि मनुष्यातील परस्परसंबधसंशोधन संस्थेतील प्रयोगशाळेतल्या वरिष्ठ संशोधन अधिकारी होतील का? आणि सगळ्या काकवा, माम्या, मावश्या, आत्या सहकारी वैज्ञानिक संशोधक? वाटतं तरी असंच हे खरं.
भाषांतरित…
 
 
 
Image by PublicDomainPictures from Pixabay 

Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

9 thoughts on “आई नावाचे करियर…

  • November 16, 2019 at 3:02 am
    Permalink

    Wow 😮 farch chhan, Carrier ch aahe te …tan man dhan otun purn karto aapan te

    Reply
  • November 16, 2019 at 10:16 am
    Permalink

    Nice thought 👌👌👌👌

    Reply
  • November 24, 2019 at 5:10 pm
    Permalink

    chan narrate kela aahes Gauri

    Reply
  • December 2, 2019 at 6:02 pm
    Permalink

    खरंय… नेहमी प्रमाणे … छान मांडलाय विषय….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!