आठवणींची कातरवेळ- कल्लोळ भावनांचा_५

आज कितीतरी दिवसांनी अशी निवांत संध्याकाळ मिळालेय. जेनी इथे असताना रोजची संध्याकाळ कधी संपायची ते कळायचं पण नाही. आजकाल मात्र कामाच्या व्यापात निवांत संध्याकाळ क्वचितच कधीतरी मिळते. पण तरीही जेनी असतेच माझ्या सोबत. ती इथून गेल्यापासून आजीसुद्धा अगदी एकट्या पडल्या आहेत. कधीतरी जायला हवं त्यांच्याकडे. अमेरिकेहून अवघ्या दोन वर्षांसाठी भारतात आली आणि आजींचं जीवन व्यापून टाकलं तिने. फक्त आजींचं की माझंही?

“नीरज, कातरवेळ आवडते का तुला?” जेनीच्या तोंडून ‘कातरवेळ’ हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेव्हा तीन ताड उडालो होतो मी. पण जेनी, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मात्र मी कधी देऊच शकलो नाही. खरंतर तू भेटेपर्यंत कातरवेळ आवडते की नाही हा विचार पण माझ्या मनात आला नाही. पण तू गेल्यावर मात्र ही कातरवेळ आवडायला लागली होती मला. तू असताना तुझ्यासोबत घालवलेले क्षण आणि तू नसताना त्या क्षणांच्या आठवणी!

मला माहिती होतं जेनी तू कुठेतरी माझ्याकडे आकर्षित होतेयस. पण तू मात्र माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त समजूतदार निघालीस.  तुला थांबवायचं कसं याचा विचार करायचीसुद्धा वेळ नाही आली माझ्यावर. तू स्वतःच थांबलीस आणि छान निर्मळ मैत्रीचं नातं फुलवलंस. मैत्री इतकी निर्मळ असते, हे पहिल्यांदा तुझ्यामुळे कळलं मला.

तुझ्यासोबत वेगवेगळया विषयांवरच्या चर्चा करता करता आयुष्यातल्या घटना, समस्या कधी तुला सांगायला लागलो ते माझं मलाही कळलं नाही. आजही मनात साचलेलं तुफान उधळून द्यायला जेनी जवळ हवी होती असं अनेकदा वाटतं.) कुठला प्रॉब्लेम आला की वाटतं जेनी असती तर, पटकन काहीतरी मार्ग निघाला असता. कधीकधी खूपच एकटेपणा जाणवतो आणि तुझ्या आठवणी डोळ्यांमध्ये दाटून येतात. फोन, मेसेजेस, इमेल सगळं चालू असतं पण त्यातून तू समोर असताना तुझा हात हातात घेऊन आश्वासक होणं नाही अनुभवता येत मला. 

काही दिवसांपूर्वी माझ्या बायकोने विचारलं मला, ‘तुला जेनी आवडायची का?’ अगदी अनाहूतपणे ‘हो’ म्हणून गेलो. जेनी आवडणार नाही, असं जगात कोणी असूच शकत नाही. पण, ‘प्रेम करायचास का तिच्यावर?’ या प्रश्नावर मात्र मी निरुत्तर झालो. प्रामाणिकपणे सांगायचं तर, या प्रश्नाचे उत्तर मलाही माहिती नाही. मी ते कधी शोधलं नाही आणि शोधणारही नाही कारण मला माहिती आहे, कितीही शोधलं तरी हाती काहीच लागणार नाही.

मला मान्य आहे, माझ्या या कातरवेळेवर माझ्या पत्नीचा अधिकार आहे. पण माझी कातरवेळ मात्र जेनीच्या आठवनींनी भरून गेलेय. काय करू मी? कितीही कामात असलो, कुठेही असलो तरी कातरवेळ नेहमीच जेनीच्या आठवणी घेऊन येते. एक क्षण का होईना जेनी आठवतेच मला. नाही… यामुळे माझ्या प्रिय पत्नीवर कधीही अन्याय नाही होऊ देणार मी.. पण तरीही जेनीची जागा कोणीच घेऊ शकत नाही, हे सत्य आहे. 

कधीकधी मला कळतच नाही देवाचे आभार मी नक्की कशासाठी मानू? जेनीसारखी मैत्रीण मिळाली म्हणून की निधीसारखी समजूतदार पत्नी मिळाली म्हणून! मला माहिती आहे ती बोलत नसली तरी आतून कुठेतरी दुखावलेय. तिच्या हक्कावर आधीपासूनच कोणीतरी कब्जा करून बसलंय हे सहन करणं खूप कठीण जातंय तिला. चेहऱ्यावर दाखवत नसली तरी मनात कुठेतरी खोल वेदना होते तिला या गोष्टीची. माझ्यामुळे नकळत का होईना पण तिच्यावर अन्याय होतोय आणि मला पूर्णपणे जाणीव आहे या गोष्टीची पण जेनीच्या आठवणींची कातरवेळ निधीला कशी देऊ? 

जेनीवर आपण प्रेम करत होतो की नाही याचं उत्तर मिळेल का कधी नीरजला? त्याच्या आयुष्यात जेनीच्या आठवणींची जागा निधीच्या  आठवणी घेउ शकतील का? 

Image by ReLea from Pixabay 

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!