तो, ती आणि पाऊस….
आज पाऊस दिवस भरलेल्या गरोदर बाईसारखा प्रसवाची वाट बघत अवघडला होता. ढग आभाळ सोडून जमिनीच्या समीप धुक्याच्या रूपाने कलले होते, ढगांना ओढून नेणारा नतद्रष्ट वारा आज दडी मारून बसला होता, उन्हाने झोंबलेल्या झाडांचे शेंडे ढगांकडे मान उंचावून बरसायची याचना करत होते, उन्हात करपलेले रस्ते आणि भेगा गेलेल्या जमिनी आवासून डोळ्यात याचना घेऊन वर बघत होत्या, घामाने घुसमटलेली माणस कुंद वातावरणात घामाच्या धारात अधिक चिंब होत कधी एकदा पडतोय हा असे म्हणत कपाळावरचा घाम रुमालाने पुसत होती. पाऊस आणि धरतीच्या मिलनाची घटिका भरत आली होती. पण…पाऊस कोणाची तरी वाट बघत होता. त्याच्या सारखाच!
तो, ती आणि गेल्या वर्षीचा पाऊस ह्यांची घनदाट मैत्री झाली होती. कारण तो आणि ती पहिल्यांदा भेटले तेव्हा बरोबर पाऊस होता. मग भेटी वाढल्या. कधी कॉफी शॉप, कधी डबल डेकर बसचा वरचा मजला, मरीन ड्राइव्ह, जुहू चौपाटी, कधी रात्रीच्या अंधारात बीकेसीच्या निर्जन रस्त्यावर गाडी बाजूला पार्क करून कोसळणाऱ्या पावसाच्या साथीने केलेले वॉक. मग इतर ग्रुप बरोबर असतानाही फक्त दोघच असल्यासारखे केलेले पावसाळी ट्रेक. तो, ती आणि पाऊस…सतत एकत्र.
एक हळुवार नात रुजत होत, पावसाच्या पाण्याने वाढत बहरत होत. तो परदेशी कंपनीत नोकरीला आणि ती एनजीओ मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर. त्या दिवशी पाऊस खूप होता. रस्ते पाण्याने भरून गेले होते. संध्याकाळी सहा वाजता अंधार झाला होता. ती तिच्या बस स्टॉपवर बसची वाट बघत इवल्याश्या छत्रीत आपली पर्स, मोबाईल आणि सौंदर्याला पावसापासून जपत उभी होती. ट्रॅफिक जॅम मुळे तासभर बस आली नाही तेव्हा तिने रिक्षा, टॅक्सी सर्वाना हात दाखवायला सुरुवात केली. इतर वेळी आशाळभूतपणे बस स्टॉप जवळ हळू हळू गाडी चालवत लोकांना चुचकरणारे टॅक्सी आणि रिक्षावाले आज थांबायलाही तयार नव्हते. ती वैतागून गेली होती, रडवेली झाली होती. मग पावसालाच तिची दया आली. मग त्याच्या नेहेमीच्या रस्त्यावर पाऊस जोरात बरसला आनो त्याला रोजचा रस्ता बदलून नवा रस्ता घ्यावा लागला!
मग पावसानेच त्याला चुचकारात त्याची गाडी त्या स्टॉप जवळ आणायला भाग पाडलं. त्याला हेडलाईटच्या प्रकाशात ती दिसली. आता पावसाने पूर्ण भिजलेली! मोबाईल आणि पाकीट पर्समधील एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊन छत्री सांभाळत अंग चोरून उभी असलेली. त्याने गाडी शेजारी उभी करून “कुठे सोडू का तुम्हाला?” अस विचारलं. ती अंधुक प्रकाशात दिसणाऱ्या त्याच्या सभ्य चेहऱ्याला ओझरत बघून थेट गाडीत बसली आणि शिवाजी सर्कल इतकंच म्हणाली. त्याने एक स्मित देऊन गाडी सुरू केली. भिजलेली असल्याने तिला एसीत थंडी वाजत होती. त्याने एसीचे टेम्प्रेचार वाढवलं. त्यांना निघालेलं बघून पाऊस खुश झाला आणि आणखी जोमाने बरसू लागला!
ट्रॅफिक पार करण्यात तासभर गेल्यावर ते मोकळ्या रस्त्यावर आले. ती भिजून काकडात होती. त्याने एका चहाच्या टपरीजवळ गाडी उभी केली. दोन स्पेशल चहा मागवले. तिनेही फार आढेवेढे न घेता चहा घेतला. तिला गरमागरम चहा घेऊन तरतरी आली. दोघे निघाले. निघाल्यावर साहजिक गप्पा, ओळख हे ओघानेच आलं. नकळत आणि गरज नसताना देखील परत भेटायची इच्छा निर्माण होऊन नंबर दिले घेतले गेले! ती उतरून तिच्या इमारतीत शिरली, त्याने गाडी सुरू केली आनो ह्या प्रवासाचा साक्षीदार असलेला पाऊस परत बरसू लागला!
मग पुढे घडत गेलेल्या भेटी आणि फुललेलं प्रेम ह्यात पाऊस त्यांचा सखा म्हणून सहभागी होता. पावसाचे चार महिने संपले. त्याची निघायची वेळ आली. आज रविवार. त्या दोघांना सुट्टी. आज दोघे त्यांच्या आवडत्या टेकडीवर, दरीच्या टोकावर बसले होते. भविष्याची स्वप्न रंगवत होते. त्याचा स्वभाव थोडा संशयी आणि पझेसिव्ह असल्याचं एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं. पण तो त्याच्या प्रेमाचा भाग आहे असं समजून ती त्याकडे दुर्लक्ष करत असे. तू कुठे होतीस, इतका वेळ का लागला, बरोबर कोण होत, तो अमुक तुझ्याबरोबर फार असतो, त्या तमुक बरोबर बोलू नको अश्या त्याच्या सुचनांना आणि त्याच्या प्रश्नांना उत्तर देताना ती दमून जात असे! आजही त्या रम्य संध्याकाळी त्याने तोच विषय काढला. ती ही नोकरी सोड. मी तुला माझ्या मित्राच्या एनजीओ मध्ये नोकरी लावतो. इथे सर्व लोक वाईट आहेत. तू सेफ नाहीस ह त्याच सुरू होत. ती म्हणाली मी इथे पाच वर्षे नोकरी करते आहे. मी सर्वांना ओळखते. सगळे लोक चांगले आहेत. तू गैरसमज नको करून घेऊ. मला तुझ्या व्यतिरिक्त कोणताही इंटरेस्ट नाही आणि आपल्या दोघात तू हे इतर लोक का आणतोस? हे ऐकून तो चिडला. ती समजावत होती. इतक्यात त्यांचा मित्र पाऊस आज शेवटच बरसून त्यांचा निरोप घ्यायला आला. त्या दोघांना दरीच्या कड्यावर एकत्र बघून खुश झाला. झरझर दरीत जाऊन तो बरसत बरसत त्यांच्यापर्यंत आला आणि त्यांना भिजवू लागला. पण तोवर त्यांचं भांडण सिरीयस झालं होतं. तो उठून गाडी सुरू करून निघून गेला. तिला एकटीला सोडून! ते पाहून पावसाचं काळीज पिळवटल. पण तो हतबल होता. त्याची जायची घटिका भरली होती. नतद्रष्ट वारा जोरात वाहू लागला. सुकलेल्या कापसासारख्या ढगांना आपल्या हातावर खेळवत तो दूर घेऊन गेला. तुला ढगात लपलेला पाऊस पुढल्या वर्षी भेटूया रे. भांडू नका रे मित्रानो अस त्या दोघांना म्हणत सुकून गेला!
वर्षभरात संशय, वाद, भांडण ह्यांनी त्या दोघात दुरावा निर्माण केला. त्याची चूक होतीच पण ती देखील त्याला समजून घेऊन थोडी तडजोड करायला तयार नव्हती. प्रेमाच्या वादाला आता इगोचा रंग चढला. गेल्या पावसाळ्यात रुजलेला, फुललेलं प्रेमाचा वेल आता पार सुकून गेला होता. पावसाळा यंदा परत जवळ आला होता. आज त्याने तिला मेसेज केला. बर्याच दिवसंजी किंवा महिन्यांनी. इतके दिवस असलेला अबोला तोडून. तो म्हणाला की आज पाऊस भरून आलाय. दिवस तोच आहे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा बस स्टॉपवर भेटलो. मी माझा स्वभाव, वागणूक, ईगो सर्व काही बाजूला ठेवायला तयार आहे. आज परत त्याच स्टॉपवर भेट. नव्याने सुरुवात करू. कायमचे जवळ येऊ. लग्न करू! मेसेज वाचून तिच्या हृदयात आनंद उचंबळून आला. मनात पाऊस सुरू झाला. पण लगेच गेल्या वर्षभरात झालेली वाईट भांडण, वाद, शिवीगाळ, गलिच्छ आरोप आठवले. मनातला पाऊस निघून गेला. ती खिडकीतून बाहेर असलेलं कुंद वातावरण बघत विचार करू लागली!
आज पाऊस दिवस भरलेल्या गरोदर बाईसारखा प्रसवाची वाट बघत अवघडला होता. ढग आभाळ सोडून जमिनीच्या समीप धुक्याच्या रूपाने कलले होते, ढगांना ओढून नेणारा नतद्रष्ट वारा आज दडी मारून बसला होता, उन्हाने झोंबलेल्या झाडांचे शेंडे ढगांकडे मान उंचावून बरसायची याचना करत होते, उन्हात करपलेले रस्ते आणि भेगा गेलेल्या जमिनी आवासून डोळ्यात याचना घेऊन वर बघत होत्या, घामाने घुसमटलेली माणस कुंद वातावरणात घामाच्या धारात अधिक चिंब होत कधी एकदा पडतोय हा असे म्हणत कपाळावरचा घाम रुमालाने पुसत होती. पाऊस आणि धरतीच्या मिलनाची घटिका भरत आली होती.
पण…पाऊस कोणाची तरी वाट बघत होता. त्याच्या सारखाच! तो बस स्टॉपजवळ पोहोचला होता. गाडीत बसून येणाऱ्या प्रत्येक बस मधून उतरणारे लोक बघत होता. त्याला बघत असलेला पाऊस पण फक्त तिची वाट बघत होता! अश्याच अवघडलेल्या अवस्थेत अर्धा तास गेला. त्याला लक्षात आलं की संपलाय! तो गाडी सुरू करणार इतक्यात अचानक पाऊस बरसू लागला. काही मिनिटात आसमंत भिजून गेला. अंधार दाटून आला! त्या बदलाचा आनंद घेऊन आयुष्यात हरलेल्या त्याने गाडीचे हेडलाईट सुरू केले. त्या प्रकाशात त्याला ती बस स्टॉपवर इवल्याश्या छत्रीत भिजत त्याच्याकडे बघत असलेली दिसली. तिच्या डोळ्यातले अश्रू पावसातही त्याला स्पष्ट दिसले. तो दरवाजा उघडून धावत तिच्याकडे गेला. तिच्या हाताला धरून तिला घेऊन येऊन त्याने गाडीत बसवली. काही न बोलता गाडी सुरू केली!
गाडी त्याच टेकडीवर येऊन थांबली! टेकडी निर्मनुष्य होती. आता पाऊस थांबला होता. निदान त्या टेकडीवर तरी! दोघे गाडीतून उतरून त्या कड्यावर गेले. दरीत पाय सोडून बसले. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. ते सर्व काही कथन करत होते. शब्दांची गरज संपली होती. त्याने तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकवले. तिने त्याला आपल्या ओल्या मिठीत घेतले. हे बघत असलेल्या त्यांच्या मित्राला….पावसाला खूप आनंद झाला. तो ढगात बसून झर्र्कन दरीत झेपावला आणि दरीला चिंब भिजवून टाकत टेकडीवर तुफान बरसू लागला! तिघे परत एकत्र आले होते तो, ती आणि पाऊस! ©मंदार जोग
Image by kai kalhh from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
Afalatun
Very nice new innings of Life👌👌👌👌