पाणीपुरी…

पावसाची चिंब संध्याकाळ. निळ्या प्लास्टिकच्या छताखाली पाणीपुरीचा स्टॉल. नशिबाने गर्दी नाही. स्टॉलवरच्या रगड्याच्या शेगडीची मस्त ऊब! मी कम तिखा दहीपुरीची ऑर्डर देऊन माझी दहीपुरी बनण्याची प्रोसेस बघत जीव रमवत असतो. इतक्यात कानावर एक मंजुळ स्वर पडतो “भैय्या एक पानीपुरी. सिर्फ तिखा!” मी वळून बघतो!

वय साधारण पस्तिशीच्या आत बाहेरच! उंची किमान 5’4″. घट्ट जीन्स, जांभळा टीशर्ट, हायलाईट केलेले सोनेरी केस मागे बांधलेले, गोरा गुबगुबीत आकर्षक चेहरा, टपोरे डोळे आणि उजव्या गालावर खळी ल्यालेली ती हातात द्रोण धरून सज्ज असते!

तिला बघून मेन भैय्या माझी दहीपुरी कळकट असिस्टंटला सोपवून जातीने तिच्या सेवेत रुजू होतो. रगड्यात पाणी आणि ठेचा टाकून शेगडीला हवा भरतो. रगडा रटरटू लागतो. भैय्या पाण्याच्या घागरीत डाव फिरवून पाणी मिक्स करतो. असिस्टंट भैय्या तिच्यावर एक नजर ठेवत माझ्या दहीपुरीसाठी बटाटा चिवडत असतो.

मेन भैय्या सज्ज होतो. ती लोभस हसत, खळीची जादू शिंपत परत सूचना देते “भैय्या सिर्फ तिखा हां!” भैय्या तिच्या डोळ्यांसारखी टपोरी एक पुरी उचलून त्यात गरम रगडा भरतो. त्या पुरीत डावेने समोरच्या घागरीतला थंड जाळ भरून त्या सुंदर जाळाच्या द्रोणात ती पुरी अलगद सोडतो! ती तिच्या हिरवट नेलपेंट लावलेल्या लांबसडक बोटांनी ती पुरी उचलते. आम्हा सर्वांच्या नजरा त्या पुरीबरोबर प्रवास करत तिच्या ओठांपर्यंत पोहोचतात. ओठ विलग करून ती परफेक्ट प्लेसमेंट असलेले तिचे शुभ्र दात दाखवत तोंड उघडते आणि ती गरगरीत पुरी आत घेऊन तोंड बंद करते. तोंडात पुरी फुटून त्यातले पाणी तिच्या घशातून सरकताना तिच्या गोऱ्या मानेच्या हिरव्या नसा प्रसरण पावतात. ती डोळे मिटून पहिल्या तिखा पुरीचा पुरेपूर आनंद घेते! ह्या सुंदर दृश्यात “मॅडम टेस्ट बराबर है ना?” असा भैय्याचा किनऱ्या आवाजात विचारलेला लडिवाळ प्रश्न आमची तंद्री भंग करतो! ती म्हणते “जी. परफेक्ट है!” मेन भैय्या खुश होऊन पुढली पुरी भरायला घेतो!

असिस्टंट अर्ध लक्ष तिच्याकडे ठेवत माझी दहीपुरी थुकपट्टी करत जेमतेम बनवतो. माझंही लक्ष नसल्याने मी ती सहज स्वीकार करतो. तोवर तिच्या सहा पुऱ्या झाल्याने मेन भैय्या हॉल्ट घेतो. लालेलाल होऊन अधिकच गोंडस दिसणारा चेहरा आणि तोंडात नुकतीच फुटलेली पुरी असलेली ती हातानेच “अजून एक प्लेट” असा इशारा करते! भैय्या खुश होऊन अजून थोड्या रगड्यात ठेचा मिसळतो. असिस्टंट भैय्याने थुकपट्टी करताना बहुधा माझ्या “कम तिखा” दही पुरीत चटणी जास्त टाकल्याने मला उचकी लागते! मी उचकी थांबवत, त्या नादात मऊ पडलेली दहीपुरी पचकवत खात असतो आणि ती सुंदरी दुसरी प्लेट तिखट पाणीपुरी खाऊन निखारा दिसत असते! कपाळावर घामाचे बिंदू, लाल झालेले गाल आणि कानशीलं, टपोऱ्या डोळ्यात साचलेलं पाणी, तिखटाने थोडे विलग झालेले ओठ आणि चेहऱ्यावर प्रचंड तृप्ती आणि समाधान!

ती एक सुखा पुरी मागते. भैय्या दोन पुढे करतो. ती पाचशेची नोट देते आणि इतरांशी शंभरच्या नोटेवरून हुज्जत घालणारा भैय्या आपल्या विजारीच्या आतील चोर कप्प्यात ठेवलेले कोमट पैसे काढून तिला बॅलन्स परत देतो! तोंडाचा जाळ झालेला मी इमानदारीत पंचवीस रुपये सुटे देऊन निघणार इतक्यात जोरात पाऊस सुरू होतो! तिच्याकडे छत्री नसते पण तिला बहुतेक घाई असते. आम्ही रस्त्याच्या ज्या बाजूला असतो तिथे रिकामी रिक्षा मिळणे अशक्य असते! ती घड्याळ बघते आणि माझ्या हातातील फुल साईज छत्रीकडे बघून मला एक खल्लास स्माईल देते. मी हसून छत्री उघडतो!

ती आम्हा सर्वांचा अपेक्षाभंग करत चक्क पावसात भिजत निघते. कसलीही घाई न करता ती भिजत रस्ता ओलांडून रिक्षा पकडते! जणू पाणीपुरीची आग पावसाने विझवते! इतक्यात माझ्या क्लायंटचा फोन येतो. मन फँटसी मधून सत्यात परत येत! पाऊसही अचानक थांबलेला असतो! जणू तिनेच तो पिऊन टाकलेला असतो! आग शांत झालेली असते! ती परत कधीच न भेटायला निघून गेलेली असते!©मंदार जोग

Image by Tanuj Handa from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

5 thoughts on “पाणीपुरी…

  • May 12, 2019 at 6:45 am
    Permalink

    Zakas panipuri👌👌👌👌

    Reply
  • May 12, 2019 at 4:24 pm
    Permalink

    वाह एकदम मस्त. चविष्ट!!!!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!