हुरहूर…

थंडीतली दुपारची गोड झोप उरकून अंजु साडेचार ला उठून बसली. विरळ होत आलेल्या केसांचा बुचडा बांधला आणि पलंगावरून खाली उतरली .. अशक्तपणा होताच अजून .. इतक्यातच डिस्चार्ज मिळाला होता तिला .. हळूहळू चालत चहाचं आधण ठेवायला ती स्वयंपाक घरात गेली.

“आज नेमक्या मावशी नव्हत्या, नाहीतर असतात दिवसभर. .. बरंय पण, जरा आपले हात हि लागावेत कधी कधी भांड्यांना! पण मी काही करणार म्हणजे सगळ्यांच्या डोक्याला व्याप. मध्येच विसरून जाण्याचा आजार कितीवेळा जीवावर बेतता बेतता राहिलाय  ! या आजारपणामुळे जरा काही करता येत नाही. सुहासला कळलं मावशी नाहीयेत आज तर काही खरं नाही. पण ते पण माणूसच ! नात झाली म्हणून गेल्यात, येतीलच कि उद्या ! इतकी वर्षे नीट सुरु होतं सगळं, या सहा महिन्यात नुसतं होत्याचं नव्हतं झालंय अगदी ..”

स्वतः च्या विचारात हरवून अंजु चहा घेत सोफ्यावर बसली. कितीतरी दिवसांनी अशी निवांत. मग हळू हळू घरभर फिरत तिने घर न्याहाळून बघितलं.

“तसं अडत नाही काही आपल्या वाचून. किती काळजी वाटली होती आपल्याला, पण झालं सगळं मॅनेज! फक्त याचा आनंद होतोय कि दुःख ते मात्र कळत नाहीये ..” अंजु स्वतः शीच खिन्नपणे हसत म्हणाली ..

मनावर आलेलं मळभ सारण्यासाठी ती गॅलरीत आली .. तिच्या हौसेने लावलेल्या झाडांना कुरवाळत राहिली बराच वेळ ..

मावळतीला आलेला सूर्य अगदी मोहक दिसत होता.. त्याच ते सोनसळी रूप, आणि सगळीकडे उधळलेलं ते सोनं .. बघता बघता तो लाल तांबडा गोळा डोंगरामागे लपला ..

आणि अचानक अंजु च्या मनात बेचैनी वाढू लागली .. कसली माहित नाही पण काहीतरी जबरदस्त घडलंय .. काहीतरी चुकतंय .. काहीतरी राहिलंय .. काहीतरी विसरतंय .. काय ते समजेना ..

तिने देवाला दिवा लावला, स्तोत्र म्हंटलं .. जरा साखर खाल्ली, स्वतः च बीपी चेक केलं घरीच .. सगळी दारं खिडक्या, नळ, गॅस, सगळं सगळं चेक केलं ..

हुरहूर काही शमेना .. “आतून” जाणीव पोखरत राहिली कसलीतरी .. अनामिक गूढ भीती .. आणि हतबद्ध झालेली ती ..

काय चुकतंय ?? काय चुकतंय ?? अंधाऱ्या वाटेवर कोणीतरी सोडून दिलं होतं तिला जणू .. काही दिसत नव्हतं, काही समजत नव्हतं .. फक्त जाणवत होतं .. काळजात लसलसत होतं ..

एक दिवस हि एकट्या धड राहू शकत नाही का आपण ?? तिला विलक्षण चीड आली .. कीव वाटली स्वतः चीच .. मग संताप संताप झाला ..

काय चुकतंय, काय होतंय , कसं शोधू ?? कोणाला विचारू ?? सुहास ??

ती फोन शोधू लागली ..

आधीच बॅटरी डाउन झालेली आणि त्यात फोन हि सापडेना ..

अंजु सोफ्यावर बसली .. धडधड वाढली तशी ती सोफ्यावर आडवी झाली .. गच्च डोळे मिटून .. डोकं कधीही फुटेल आता असं वाटू लागलं तिला ..

तिकडे मात्र तिला न आठवणारं तिची आठवण काढत कुढत बसलं होतं ..

शाळेबाहेर तिचं पिल्लू रस्त्यातच बेंच वर रडत बसलं होतं .. भुकेलं .. घामेजलं .. घ्यायला कोणीच आलं नाही म्हणून ..

येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक बाईकडे व्याकुळ डोळ्यांनी आशेने बघत .. प्रत्येक गाडी जवळ आली की क्षणभर थांबत .. परत रडत होतं ते भेदरलेलं कोकरू ..

Image by Gerd Altmann from Pixabay 

Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

3 thoughts on “हुरहूर…

  • January 28, 2020 at 6:17 pm
    Permalink

    हुरहूर खूपच छान
    कमाल 👍

    Reply
  • April 13, 2020 at 7:35 pm
    Permalink

    हुरहूर,,,पुढचा भाग नाही का उपल्ब्ध?

    Reply
    • May 15, 2020 at 6:21 pm
      Permalink

      Next part ahe ka….nahitar amchyahi manala hurhur …ekatya kokrachi..

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!