काळरात्र…
स्वतःवरच चडफडत होतो.
हे तुंबलेल्या गटारीसारखं.
निचरा होत नाही.
प्रवाह थांबलेला.
नुसती भळभळ जखम.
नाहीतर ,
थर्मामीटरमधल्या पार्यासारखं.
टेंपरेचर इतकं वाढावं ,
की ते मोजणं त्याच्या कपॅसीटीबाहेर.
नुसता फुगवटा.
खळ्ळखटाक.
एका क्षणी तो पार्याचा फुगा, काच फोडून बाहेर येणार.
तसंच.
सहनशक्ती संपत चाललेली.
मी धुसफूसत होतो.
कुणीतरी माणूस हवं.
आपलं माणूस.
ज्याच्यावर राग काढता येईल, असं माणूस
एकदम बायकोची आठवण झाली.
ती शेजारी असती, तर वसकन् ओरडलो असतो.
ऊगाचच.
तिनेही दोन शब्द सुनावले असते.
थोडीशी नोंकझोक.
मग नेहमीसारखी मांडवली.
थोडासा चावटपणा.
छान वाटलं असतं.
बायकोवर चिडायचं कारण,
बाॅसवर चिडता येत नाही म्हणून.
हरामखोर साला.
मुद्दाम.
मुद्दाम मला या बेटावर पाठवलंय.
पावसाचे दिवस.
आडवाटेवरचं गाव.
अंधारट स्टेशन.
एकच पॅसेंजर ऊतरला.
दुसरा कोण ?
मीच तो.
निर्विकारपणे , गाडी गुपचूप निघून गेली.
स्टेशनवरच्या काळसर अंधाराने,
माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं.
रात्रीचा दीड वाजलेला.
सकाळपर्यंत वेळ काढायला हवा.
या स्टेशनपासून पुढे पंचवीस किलोमीटर.
तिथली कुठलीतरी पेपर फॅक्टरी.
तिथला जनरटेर बोंबललाय.
त्याला ‘बरं’ करण्यासाठी माझी वरात.
बाॅसनं गाजर दाखवलेलं.
पुढचा शनिवार रविवार जोडून सुट्टी घे..
आम्ही गाढव.
काठीला टांगलेल्या गाजरामागे पळत पळत, इथं आलो.
सकाळी सात वाजल्यानंतर इथनं टमटम मिळतात.
पेपरमिलपर्यंत पोचवतात.
तोवर ?
वेळ काढायचा.
आख्खा प्लॅटफाॅर्म ओला झालेला.
बुड टेकायला कोरडी जागा नाही.
एकदम पावसाच्या अंगात आलं.
वेड्यासारखा कोसळायला लागला.
रपरप.
आडवा तिडवा.
माजावर आलेल्या रेड्यासारखा..
भान सोडून.
कोसळधार .
पावसाचे थेंब ओल्या रूळांवर, इतक्या जोराने आदळत होते की ……
रूळांना भोकं पडावीत.
डोक्यावर छप्पर नाही.
मी आडोसा शोधू लागलो.
पळायला लागलो.
ओव्हरब्रिज दिसला.
त्याच्या पायर्यांखाली.
इथं ठीक आहे.
निदान पावसाला तरी रोखून धरलंय.
काय पण साला, टुचकं स्टेशन आहे ?
डोक्यावर छप्पर नाही.
औषधालाही माणूस नाही.
पुन्हा बाॅसचा ऊद्धार.
अगदी समोर.
वीज लकाकली.
कानठळी आवाज करीत अंधारात गुडूप.
क्षणभरच.
अंधार कापणारा ऊजेड.
त्या ऊजेडातच तो दिसला.
येडचॅप.
चुरगळलेला पायजमा.
आखूड नेहरूशर्ट.
भुरटे कुरळे केस.
अस्ताव्यस्त चेहरा.
शून्यात नजर लावलेले डोळे.
हातात छत्री.
निस्तब्ध.
जणू पावसाबरोबर ‘स्टॅच्यू’ खेळत होता.
दोन चार वेळा विजा लकाकल्या.
तो तसाच ऊभा.
तसाच दिसला.
मी जरा रिलॅक्सलो.
खांद्यावरची सॅक काढून ठेवली.
माझ्याच लाल बॅगवरती.
ब्रिजच्या एका खांबाला टेकून ऊभा होतो.
मनाला चळ लागलेला.
त्याच्याकडे फ्लॅशींग लाईटमधे बघत बसलो.
सोबत मिळाली होती.
येडचॅपच होता तो.
एवढ्या रात्री, इथं काय करत होता कुणास ठावूक ?
इतक्यात दूरवरून एक ऊजेडी ठिपका दिसला.
हळूहळू मोठा होत चाललेला.
रस्त्यावरच्या रूळांना सोनेरी करत पुढे येणारा.
घुमरी हाॅर्न मारत,
कुठलीतरी गाडी स्टेशनाकडे संथ येत होती.
तो आता मला स्पष्ट दिसू लागला.
इतका वेळ मेल्यासारखा ऊभा होता.
आता मात्र अस्वस्थ.
जीवघेणी चुळबूळ.
त्यानं छत्री बंद केली.
पायांची सायकल चालवून बघितली.
हात लांब करून झाले.
एवढा वार्मअप पुरेसा असावा त्याला.
एकदम तो ओणवा होवून, गाडीची वाट बघू लागला.
चेहरा टेन्शनी.
धीर गोळा करू पाहणारा.
याचं लक्षण काही ठीक दिसत नाही.
साला , हा काय मरायला आलाय काय इथं ?
माझ्या छातीत धस्स झालं.
गाडी जवळ जवळ येत चाललेलो.
” ए थांब….”
मी जीव खावून ओरडलो.
वेड्यासारखा त्याच्या दिशेने पळालो.
त्याच्या डाव्या हाताची तीन बोटं, माझ्या हाताला लागली.
ती पकडली…
आणि जीव खावून खेचला त्याला.
वाचला…
प्लॅटफाॅर्मवर धप्पकन सांडला.
कदाचित हाड मोडलं असावं..
पण जीव वाचला.
गाडी धडधडत पुढे गेली.
स्टेशनवर न थांबता.
माझं काळीजही तसंच धडधडत होतं.
धड्डाधडऽऽऽ.
त्याच क्षणी..
कानठळी आवाज.
धुराळा.
डोसेवाल्याने तापल्या तव्यावर, तेलाचे शिंतोडे ऊडवावेत.
आवाजाने स्सऽऽस्स करत जीभ चावावी…
तसलं…
स्सऽऽस्स झालं काळजात.
काळीज चिरणारं दृश्य.
मी ब्रेकींग न्यूजच्या कॅमेर्यासारखं निर्जीवपणे बघत होतो.
तिथंच तर होतो.
एका क्षणापूर्वी तिथंच होतो.
तो ओव्हरब्रीज कोसळलेला.
आडवा झालेला.
मी नक्की आऊट झालो असतो..
त्या येडचॅपसाठी, पन्नास साठ पावलं पळालो असेन.
म्हणूनच वाचलो.
एकदम येडचॅप आठवला.
पुलापासून पुढे पन्नास पावलांवर तो सांडलेला.
तो तिथं नव्हताच.
कुठं पळाला कुणास ठावूक ?
त्याला सोडा.
मी अजून थरथरतच होतो.
काळझोपेतून जागं व्हावं, तसं स्टेशन जागं झालेलं.
कुठूनशी अचानक ,खूप माणसं गोळा झाली..
माझी बॅग आणि सॅक…
तिथंच पुलाखाली..
” नशीब..
पुलाखाली कुणी नव्हतं..”
मी रेल्वेवाल्यांना समजावत होतो.
ती लोकं कामाला लागली.
ढिगारा ऊपसू लागली.
माझी लाल बॅग आणि सॅक. ..
तशीच्या तशी.
फक्त धुळीत माखलेली..
सापडली.
भगवान का लाख लाख शुकर..
पहाट होत आलेली.
स्टेशनबाहेर जाग आलेली.
गाव स्टेशनवर ‘मजा’ पहायला गोळा होत होतं.
मला एकदम चहाचं सेन्सेशन आलं..
स्टेशनबाहेर नक्की मिळेल.
मी बाहेर जाण्यासाठी तयार….
एवढ्यात आरडाओरडा..
गोंधळ.
” बाॅडी सापडली..”
ढिगारा ऊपसून बाॅडी स्टेचरवर..
चार रेल्वेवाले बाॅडी घेवून चाललेले.
मी घाबरत घाबरत बघितलं..
चक्काचूर…
बाॅडीचा चेंदामेंदा.
ओळखण्याच्या पल्याड.
फक्त एका हाताची मूठ शाबूत होती.
हाताच्या मुठीत छत्रीचं हॅन्डल दिसलं.
मला ओळख पटली.
दरदरून घाम फुटला.
धडधड वाढली.
देवळातल्या बाप्पाला नमस्कार करावा ,
तसा मी त्या बाॅडीला नमस्कार केला.
हजार वेळा तरी नक्कीच.
देव असतो ?
नक्कीच…
काळरात्र संपलेली.
जिवंत पहाट मला जिवंत करून गेली.
Image by David Mark from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Bhaya ithale sampat nahi
बापरे!!!
भयानक