सेल्फी ……
समोर हरिणांचे कळप, सोबत काही माजलेली काळवीटं. त्याचा दीड लाखाचा कॅमेरा सरसावलेला. प्राण्यांना डिस्टर्ब न करता फोटो काढण्याचं त्याचं कसब, पण हरणांनी हैराण केलं होतं. त्याला हवे तसे नैसर्गिक फोटो येत नव्हते. पण तोही हार मानणारा नव्हता.
दुपारी सागरेश्वराचं दर्शन घेतल्यावर मित्रांनी महादूने दिलेला डबा काढला. कोवळ्या गवारीची भाजी, भाकरी अन मोठवड कुटलेल्या शेंगदाण्याचा ठेचा. पोरांच्या तोंडाला पाणी सुटलं.
पोरं कसली, एकेका पोरांचे बाप झाले होते. पण कॉलेजातले जानी दोस्त. एकत्र आले की पोरच. सगळे डॉक्टर्स, आपापली स्पेशालिटी घेतलेले. राहुल गायनॅक होता. एकदम एक्स्पर्ट….. पोटाकडे बघताच, सोनोग्राफी सुरू. कधीही आडाखे न चुकलेला, पण हल्ली सतत डिलीवऱ्या करून वैतागलेला. किती करणार? स्वतःसाठी कधी काढणार वेळ ? म्हणून हा विकेंड चारी मित्रांनी, मुद्दाम बाजूला काढलेला. आपापली लाखांची प्रॅक्टिस बंद ठेवून चौघेही एकत्र आले.
अखेर, दुपारनंतर बेत जमला. सागरेश्वराजवळच्या झऱ्यावर सावलीला काही हरणं उतरली अन फोटोग्राफीचा मूड लागला. राहुलच्या फोटोग्राफीला आता बहर आला होता. अगदी हवे तसे फोटो मिळत होते. हरिणांच्या वेळावणाऱ्या माना अन पाणीदार डोळे कॅमेऱ्यात त्यानं अचूक टिपले होते. त्यांचा पाठलाग करत कधी सनसेट पॉईंट वर पोहोचला त्याचं त्यालाही समजलं नाही. आजमात्र त्यानं सूर्यास्त कॅमेऱ्यात कैद केला नाही. हा सूर्यास्त वेगळाच होता. अगदी उदास वगैरे करणाराही नव्हता, पण थोडा नॉस्टॅल्जिक. आपल्याच मनातलं , काहीतरी आतुन , टकटक करत असल्यासारखं.
रात्र झाली होती, हवेत गारठा होता, महादूनं आधीच गेस्ट हाउसच्या बाहेर, शेकोटी पेटवली होती. किचनमध्ये तयार झालेल्या गावठी कोंबडीच्या वासानं, पोटात आग लागली होती. अशात स्कॉच न निघती तर नवल.
धुंद स्कॉच, वाफाळलेलं चिकन, अन जुन्या आठवणी. बस्स, मिल बैठे हो चार यार. आठवणी …… काही मित्रांच्या, काही मैत्रिणींच्या अन काही इच्छा असूनही मैत्री न होऊ शकलेल्या. बघता बघता वातावरण धुंद झालं, मनं कॉलेजमध्ये पोहोचली. प्रत्येकाचा कुठला न कुठला कोपरा, जरासा दुखावलेला, ……… मनातल्या मनात, गोंजारत, आजपर्यंत मुद्दाम हळवा ठेवलेला, आज, उघड होत होता.
राहुलचं मन मात्र कॉलेजमध्ये पोहोचलं नाही. कुठशी शाळेतच हरवलं. ती दोन वर्षे मागे होती. रहायलाही जवळपासच. रोजची नजरानजर. …… नुसतीच नजरानजर. शाळेतल्या वयात, तेवढंही किती भारी वाटायचं.
त्याच्या घरासमोरून तिचं जाणं, त्याला कुठून कळायचं माहीत नाही. घरच्यांच्याही नकळत, तो आपसूक खिडकीत, नाहीतर, दारात यायचा. हळूहळू बोलणं चालणं वाढू लागलं. तिच्या मैत्रिणीने बरीच मदत केली. अगदी गुलाबफुल पोचवण्यापर्यंत.
नंतर राहुल कॉलेजमध्ये बिझी झाला. तरीही हळूच तिला भेटायचाच. मेडिकल तिचं फिल्ड नव्हतं. दोन वर्षांनी ती इंजिनिअरिंगला गेली. पण तिला मात्र ऍडमिशन पुण्यापासून दूर मिळालं. खरंतर, तिच्या वडिलांनी त्यासाठी खास प्रयत्न केले, कराडला ऍडमिशन घेण्यासाठी. तिकडेच कुठशी कुंडल जवळ त्यांचं मुळ गाव होतं. तिच्या वडिलांचीही रिटायरमेंट नंतर गावीच सेटल होण्याची इच्छा होती.
ती त्यांनी पूर्ण केली ……. तिचं लग्नही तिकडे गावीच लावून……. …………………….
काहीच समजलं नाही. इंटर्नशीप सुरूच होती. एका रविवारी तो घरी आला होता. टीपॉयवर पत्रिका दिसली. वडिलांचे जुने मित्र, म्हणून आग्रहाचं निमंत्रण. तिकडेच कराडकडे, ……. राईट ….. तासगाव. तासगावात दिलं होतं तिला.
त्यानं पटकन गुगल मॅप काढला. चेहऱ्यावर एकदम हास्य फुललं. सागरेश्वर अभयारण्याच्या शांत वातावरणात अचानक बासरी ऐकू यावी तसा भास झाला क्षणभर. अवघ्या पस्तीस किमी वर ती होती. त्या परिसरात तो कधी येईल …… असं त्यालाही कधी वाटलं नव्हतं. आपण तिच्या परिसरात आहोत, या विचारानेच मन प्रसन्न झालं होतं…… पॅक ……. आता त्याला स्कॉचची गरज नव्हती. तो हवेत होता. हवा तिच्या गावची होती. जणू तिचाच गंध घेऊन येत होती. तो वेडावला होता. आता समजलं होतं की आजचा सूर्यास्त एवढा वेगळा का होता.
बस्स, तासगावला जायचं,….. का ? माहीत नाही,. तिला भेटायचं ? माहीत नाही. अगदीच तशी गरजही नाही. तासगाव केवढं ? लोकवस्ती केवढी ? तिचा पत्ता, काहीच माहीत नाही. पण तासगावातून जायचं. तिथली हवा घ्यायची उर भरून. तिथलं पाणी प्यायचं पोट भरून. ती भेटेल न भेटेल पण जायचं.
“ताई, आता कॉम्प्युटर क्लास चालवते.” तिच्या छोट्या बहिणीनं लग्नानंतर दिलेली माहिती त्याला आठवली.
त्यानं पुन्हा गुगल मॅप काढला.
“अरे इथून जवळ आहे, नरसोबाची वाडी.”
“आता हे काय मध्येच तुझं राहुल्या …..” पद्या पचकला.
” अरे जाऊ या की उद्या, …… इतक्या दूर आलोय , थोडी वाकडी वाट करून जाऊ या.”
” आणि ही वाकडी वाट किती किलोमीटरची आहे ?”
“फक्त पंचावन्न किलोमीटर.”
” मग तू ड्राईव्ह करायचं उद्या ….पुण्यापर्यंत, ठीक आहे ?”
” ओके बॉस,…. आय एम अल्वेज रेडी टू ड्राईव्ह.”
राहुल्याचा देवदर्शनासाठीचा उत्साह, बुचकळ्यात टाकणारा होता खरा. पण विचार करण्याची वेळ स्कॉचने कधीच काढून घेतली होती. सर्वांचा होकार घेऊनच राहुल झोपला. झोप येणार नव्हतीच. व्हाया तासगाव जाणार, ही कल्पनाच किती सुखद होती.
सकाळी त्यानंच उठवलं सर्वांना, …… सागरेश्वराच्या पठारावर सूर्योदयही अप्रतिम होता. फटाफट आवराआवर करून मंडळी तयार.
फक्त चहा घेऊन मंडळी निघाली. यशवंतरावांच्या देवराष्ट्रेवरून कार उजवीकडे वळली अन उताराला लागली. तासगावला बायपास करणारा रस्ता कुणाच्या लक्षातच येऊ नये म्हणून त्यानं मुद्दामच कार एका तासगाव एसटीच्या मागे ठेवली.
“एवढा का चेकाळला आहेस राहुल्या?”
“मी ? कुठं ?”
“मग स्वतःशीच हसत ड्राइव्ह करतोयस ? काय भानगड ?”
राहुल्या वरमला. भावना लपवायचं दहावीतलं कसब हरवलं वाटतं. पण तासगाव जवळ आलं तशी त्याची नजर भिरभिरु लागली. सुरुवातीला काही बंद हॉटेल्स लागली. वाटलं त्यापेक्षा मोठं गाव होतं. तिच्या नवऱ्याची ऊसशेती होती म्हणे. शिवाय किर्लोस्करला इंजिनिअर. समृद्ध गाव. अनेक हॉटेल्स, पेट्रोल पंप्स, कृषीविषयक दुकानं, सोसायट्या, बँका ओलांडत ते आटपाडी चौकात आले. अर्थातच, सात साडेसातची वेळ. सगळं बंदच. एसटीस्टँड जवळ थोडीशी चहलपहल. राहुलची नजर भिरभिरतीच. वाकून वाकून पुढच्या ग्लास मधून काय शोधतोय ? कशासाठी ? काहीच समजत नव्हतं ? पण तो कार प्रचंड सावकाश चालवत होता.
स्टँड क्रॉस झालं न त्याचे डोळे चमकले…….
“स्मिता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट”
आपसूक कार बाजूला पार्क झाली.
“काय झालं ?” सगळ्यांचा एकच प्रश्न.
“एकेक चहा मारू या रे.”
वरच्या मजल्यावर इन्स्टिट्यूट, खाली एक सुपरमार्केट अन काही दुकानं. सगळीच बंद. बरोब्बर समोर, चहावाल्याची गाडी. चहाचा ग्लास हातात घेऊन तो इन्स्टिट्यूटकडेच पहात होता……..
त्यानं सेल्फी घ्यायला सुरुवात केली, मित्रांसोबत….. चौघांनी चहाचे ग्लास भिडवले. हसते खेळते फोटो …… अगदी बीजे च्या बाहेरच्या टपरीवर चहा पिण्याचे दिवस आठवले. सर्जेरी सिम्युलेशनच्या नावाखाली वेगवेगळे प्राणी फाडून कंटाळायचे अन फ्रेश होऊन चहाची टपरी गाठायचे. एकेक कटिंग, हातात सिगारेट. धुव्वा दिवस होते ते, आज पुन्हा लाईव्ह होत होते. खूप सारे सेल्फी घेतले.
अजून जास्त वेळ तिथं काढणं , शक्य नव्हतं. नरसोबाच्या वाडीत दर्शन घेऊन संध्याकाळपर्यंत पुणं गाठायचं होतं. तिथं थांबण्याचं कारण मात्र, राहुल शेअर नाही करू शकला.
नरसोबाच्या वाडीत, कृष्णेच्या पाण्यात पाय सोडून निवांत बसला. कुठंही न मिळणारा शांतपणा, प्रसन्नता मनात भरून घेत राहिला. या ट्रिपने खूप काही दिलं होतं त्याला.
अरे हो, सहज आठवलं, शांतपणे मघाचे सेल्फी पाहू लागला.
प्रसन्न सकाळ, प्रचंड आनंदी चेहरे, अगदी चहावाल्यासह , हातात वाफाळलेला चहा, अन , ……………
अन, मागे वर स्मिता कॉम्पुटर इन्स्टिट्यूटचं जाहिरातीचं होर्डिंग ……. होर्डिंगवर तिचा नमस्कार करणारा फोटो. ……
Image by Moritz Lübken from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
👍
मस्तच
खुप छान…
👌👌👌
मस्त
Thanks to all
Mast
Ohhh kiti mast shevati ekdum vait vatun gel ..
Superb
धन्यवाद मित्रानो
Chhan..